एसआयटीच्या चौकशीला वैतागून तक्रार धारकावर शिक्षकाचा हल्ला. संभाजीनगर शहर पोलीस ठाण्यात शिक्षकावर N. C. R. दाखल.
परळी वैजानाथ /प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील बहुचर्चित बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील एक तक्रारदार आणि राष्ट्रीय युवा काँग्रेस पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष श्री. रणजीत रामराजे देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “माझी तक्रार एसआयटीकडे (SIT) का केली,” असे विचारत परळी येथील वैद्यनाथ विद्यालयाचा वादग्रस्त शिक्षक संजय सोपान गुट्टे याने ही धमकी दिली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातल्या एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू आहे. वैद्यनाथ विद्यालय, परळी वै. ही शाळा या घोटाळ्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मे २०१२ पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानाही या शाळेत संच मान्यतेत जागा नसतानाही १५ ते २० शिक्षकांची बोगस भरती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या शाळेत २८ ते ३० शिक्षक अतिरिक्त असतानाही त्यांचे पाच वर्षांपासून समायोजन झालेले नाही. यामुळे दर महिन्याला २० ते २५ लाख रुपयांची शासकीय निधीची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप आहे. प्रस्तुत शाळेतील १५-२० बोगस शिक्षकांमध्ये संजय सोपान गुट्टे याचाही समावेश आहे. गुट्टे याची नियुक्ती २००५ मध्ये दाखवून शिक्षक भरती बंदी असतानाही बोगस मान्यता मिळवल्याचे सर्व पुरावे रणजीत देशमुख यांच्याकडे आहेत. देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री, एसआयटी प्रमुख (वि. आयुक्त पुणे), तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस विभागाकडे केली आहे. रणजीत देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत, एसआयटी पथकामार्फत दि. १७.१२.२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मा. वि. शिक्षण उपसंचालक कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीस तक्रारदार रणजीत देशमुख, संस्थाचालक आणि संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती. असे असतानाही, संजय सोपान गुट्टे हा शिक्षक शाळेतून गैरहजर राहून संभाजीनगर उपसंचालक कार्यालयात पोहोचला. त्याने कार्यालयाबाहेर येऊन रणजीत देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. संजय सोपान गुट्टे याच्या धमकीला न घाबरता रणजीत देशमुख यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस स्टेशन गाठले आणि गुट्टे याच्याविरुद्ध एन.सी.आर. (Non-Cognizable Report) दाखल केली आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हा प्रकार बोगस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या वाढलेल्या मुजोरीचे दर्शन घडवणारा असून, तक्रारदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारा आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.