बीडमध्ये दुष्काळाचं सावट अन् मेळाव्यांचा बाजार! कोटींचा खर्च करून नेत्यांचे शक्तिप्रदर्शन;बळीराजा मात्र हवालदिल.
बीड | प्रतिनिधी: एका बाजूला बीड जिल्ह्याला तीव्र दुष्काळाने विळखा घातला आहे, पिण्याच्या पाण्यासाठी आणि जगण्यासाठी सर्वसामान्य माणूस अन् शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे; तर दुसऱ्या बाजूला याच दुर्दैवावर आणि हलाकीवर राजकारणाची पोळी भाजण्यासाठी नेत्यांचे शक्तिप्रदर्शन जोमात सुरू आहे. जिल्ह्यात आज दसरा मेळाव्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत नेत्यांनी मेळाव्यांचा मोठा बाजार भरवल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
कालवे कोरडे, शेती उद्ध्वस्त! जिल्ह्यात सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कालव्यामध्ये केवळ ९% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष इतके टोकाला गेले आहे की, गुराढोरांच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली जवळपास ९९% पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
लाखो रुपयांचे कर्ज काढून केलेली पेरणी डोळ्यांसमोर वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. “उद्याच्या सूर्य उगवल्यावर आमच्या पोराबाळांचं काय होणार?” या विदारक चिंतेत बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस अक्षरशः पिचून गेला आहे. नेत्यांचे ‘गड’ आणि मेळाव्यांचा खेळ जिल्ह्यातील जनता जेव्हा जगण्यासाठी अन्नान्नाची भटकंती करत आहे, अशा अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याच्या काळातही राजकीय नेत्यांना मात्र सर्वसामान्यांच्या वेदनेशी काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने: मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या भक्ती गडाच्या मंचावरून गर्दी जमवत आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आमदार सुरेश धस यांनी एका नव्या मच्छिंद्र गडावर मेळाव्याचा डाव मांडत राजकीय वातावरण तापवले. करोडोंची उधळपट्टी; सामान्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी नेत्यांनी पाण्याचा आणि शक्तीचा वापर करत कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दुष्काळाच्या तोंडावर उभे राहून जनतेच्या पैशांची किंवा शक्तीची उधळपट्टी करणाऱ्या या राजकीय मंडळींना आज राजकारणाशिवाय आणि सत्तेच्या समीकरणांशिवाय कशाचीही तमा उरलेली नाही, हेच यावरून सिद्ध होते. बळीराजा कोरड्या पिकांकडे बघून रडतोय आणि नेते मात्र मेळाव्यांच्या मंचावरून टाळ्या मिळवण्यात मश्गुल आहेत. दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याऐवजी त्यांच्याच वेदनेवर राजकीय पोळी भाजणाऱ्या या नेत्यांविरोधात आता सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.