शिक्षण क्षेत्राला काळाकुट्ट काळीमा! पटसंख्या आणि बोगस शिक्षक भरती टिकवण्यासाठी बीडमध्ये विद्यार्थ्यांची खरेदी-विक्री;शाळेच्या भिंतीवरच ‘रेटकार्ड’
बीड: पटसंख्या मॅनेज करून बोगस पद्धतीने भरलेली व अतिरिक्त ठरणारी शिक्षक पदे वाचवण्यासाठी बीडच्या चंपावती शाळेतील विद्यार्थी खरेदी-विक्रीचा प्रकार ताजा असतानाच, आता वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील ‘राजेसाहेब विद्यालयात’ यापेक्षाही भयानक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बोगस शिक्षक भरती आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पगार लाटण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची (T.C.) हजारो रुपयांत खरेदी-विक्री करण्यात आली असून, कोणत्या शिक्षकाने किती विद्यार्थी आणले आणि त्यांना किती पैसे दिले, याचे थेट ‘रेटकार्ड’च शाळेच्या स्टाफ रूममध्ये चिकटवण्यात आले असल्याचे समोर आले आहे! शाळेत लावलेल्या या रेटकार्ड यादीत प्रस्तुत शाळेतील शिक्षिका पाटील मॅडम (₹१०,०००), स्वामी सर (₹२०,०००), सावंत सर (₹१५,०००) यांच्यासह जाधव सर, गायकवाड मॅडम, राऊत मॅडम अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे, त्यांनी आणलेले विद्यार्थी आणि त्यापोटी संस्थाचालकांनी दिलेले पैसे यांचा स्पष्ट उल्लेख आहे. यामध्ये जिजामाता विद्यालय, बाळू बादडे आणि छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षकांकडून विद्यार्थी विकत घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
बीडच्या चंपावती शाळेनंतर वडवणी मधील कुप्पा शाळेतील महाघोटाळा:- बीडच्या चंपावती शाळेतील मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी उत्तराखंडमधून ३ विद्यार्थी खरेदी केले होते आणि एका इंग्लिश स्कूलमधील २९२ विद्यार्थी दाखवून गैरव्यवहार केला होता. त्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबन व गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आता कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयातील या रेटकार्डमुळे संपूर्ण बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शिक्षण क्षेत्र हादरले आहे.
अधिकारी आणि संस्थाचालकांचे मोठे रॅकेट! लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन केलेली बेकायदेशीर शिक्षक भरती टिकवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय (छत्रपती संभाजीनगर), माध्यमिक शिक्षण विभाग (जि. प. बीड), वेतन अधीक्षक कार्यालय, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या संगणमतानेच हा महाघोटाळा पचवला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. एवढा उघड बोगसपणा समोर येऊनही बीडचा शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी या महाघोटाळ्याविरोधात ‘भ्रष्टाचार निर्मूलन समिती’चे राज्य अध्यक्ष इंजिनिअर सादिक इनामदार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शिक्षण आयुक्त, एसआयटी (SIT), शिक्षण संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.”शासकीय तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा सडेतोड इशारा इनामदार यांनी दिला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.