ताज्या घडामोडी

​चौकशी अहवाल लपवण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना केज गटशिक्षण कार्यालयाचा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व एक शिक्षक रंगेहाथ चतुर्भुज;जालना एसीबीची धुमधडाक्यात कारवाई. बीडच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा खळबळ!!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

​चौकशी अहवाल लपवण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना केज गटशिक्षण कार्यालयाचा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व एक शिक्षक रंगेहाथ चतुर्भुज;जालना एसीबीची धुमधडाक्यात कारवाई.

बीडच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा खळबळ!!

​केज: चौकशी अहवाल बिनधोक तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठी म्हणजेच दाबून ठेवण्यासाठी आणि प्रकरण निर्दोष असल्याचे दाखवण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना केज गटशिक्षण कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि त्यांचे सहकारी एका जिल्हा परिषद शिक्षकाला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बहाद्दर (ACB) पथकाने बुधवारी (दि. १४) दुपारी रंगेहाथ केज मध्येच पकडले. या धडक कारवाईमुळे केज पंचायत समितीच्या शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.जालन्याच्या ​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकलेले संशयित खालील प्रमाणे आहेत. ​१. दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५६ वर्षे) – कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण कार्यालय,पंचायत समिती केज. २. जयगुरु शिवाजी गिरी – जिल्हा परिषद शिक्षक, तांदळे वस्ती. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चौकशी अहवालासंदर्भातील कार्यवाही केज पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सुरू होती. हा चौकशी अहवाल व्यवस्थित तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे निर्दोष पणे सादर करण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे उर्फ दत्ता चाटे व जि. प. शिक्षक जयगुरु गिरी यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) जालना येथे सविस्तर तक्रार दाखल केली. ​तक्रार प्राप्त होताच जालना एसीबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीची अत्यंत गुप्तपणे पडताळणी केली. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास केज येथील शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्रात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने धाड टाकून दोन्ही संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी चतुर्भुज झाल्यानंतर ​केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ​या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही बातमी फ्लॅश होईपर्यंत उशिरापर्यंत सुरू होती. तक्रार प्राप्त होताच तातडीने सूत्रे हलवून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी सापळा रचून कारवाई केल्याबद्दल जालना एसीबीच्या बहाद्दर पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये