विशेष प्रतिनिधी, पाठलाग न्यूज/ बीड: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आणि माणुसकीला कलंकित करणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. एका खाजगी शाळेच्या संस्थाचालकाने शिक्षिका किंवा महिला कर्मचाऱ्याला चक्क घराची धुणी-भांडी आणि शेतातील खुरपणी करण्याची सक्ती केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे काम करण्यास नकार दिला म्हणून संबंधित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला संबंधित संस्थाचालकाच्या शाळेत कार्यरत आहे. अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्याने जेव्हा ही महिला आणि तिचे पती संस्थाचालकाकडे हक्काचा पगार मागण्यासाठी गेले, तेव्हा संस्थाचालकाने त्यांना धक्कादायक अटी घातल्या. “माझ्या घरी येऊन धुणी-भांडी करा, शेतात जाऊन खुरपणी करा, तरच तुमचा पगार देईन; नाहीतर पगार देणार नाही,” अशी धमकीवजा भूमिका संस्थाचालकाने घेतली.
पतीला मारहाण अन् अश्लील शिवीगाळ या अन्यायाविरुद्ध जेव्हा महिला आणि तिच्या पतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संस्थाचालकाची गुंडगिरी पाहायला मिळाली. संस्थाचालकाने सर्व मर्यादा ओलांडत पीडित महिलेला अत्यंत हीन दर्जाची आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, वाद घालणाऱ्या तिच्या पतीवर धावून जात त्यांना बेदम मारहाण देखील केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असून, संपूर्ण बीड जिल्ह्यातून या संस्थाचालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “ज्ञान देणाऱ्या मंदिरात अशा प्रकारची गुलामीची वागणूक दिली जात असेल, तर महिलांनी सुरक्षित कुठे राहावे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारावर कडक कारवाईची मागणी पगार मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे जुलूम करणे, महिलेचा विनयभंग व शिवीगाळ करणे आणि मारहाण करणाऱ्या या मुजोर संस्थाचालकावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर आता बीड पोलीस आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.