ताज्या घडामोडी
केज बस स्थानकात ‘लाल परी’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा; अधिकारी, स्थानिक नेते आणि पत्रकारांची उपस्थिती.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज बस स्थानकात ‘लाल परी’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा; अधिकारी, स्थानिक नेते आणि पत्रकारांची उपस्थिती.
केज: सर्वसामान्य जनतेची वाहिनी आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’चा आज वर्धापन दिन केज येथील मध्यवर्ती बस स्थानकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक दशकांपासून अविरतपणे प्रवाशांची सेवा करणाऱ्या या लाल परीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केज आगाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून केज बस स्थानकात येणाऱ्या एसटी बसची आकर्षक सजावट आणि पूजा करण्यात आली. तसेच एसटी चालक, वाहक आणि प्रवाशांचे पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य कणा असलेल्या एसटी महामंडळाने आजवर प्रतिकूल परिस्थितीतही आपली सेवा सुरू ठेवली आहे, याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
या सोहळ्याला धारुर आजाराचे आगारप्रमुख श्री बिक्कड व त्यांची टीम, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी,केज येथील स्थानिक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना वक्त्यांनी, “एसटी केवळ एक वाहन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा एक अविभाज्य भाग आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. लाडक्या ‘लाल परी’चा वाढदिवस बस स्थानकात साजरा होत असल्याचे पाहून प्रवाशांमध्येही आनंदाचे वातावरण होते. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी एसटीच्या प्रवासातील आपले अनुभव सांगत महामंडळाच्या सेवेचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हनुमंत भोसले सरांच्या संचलनासह केज आगारातील सर्व अधिकारी, लिपिक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




