धनादेश न वटल्याप्रकरणी बीडच्या आरोपीला १ वर्ष कारावास आणि १० लाखांचा दंड. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची फसवणूक भोवली; न्यायालयाने सुनावली कडक शिक्षा.
धनादेश न वटल्याप्रकरणी बीडच्या आरोपीला १ वर्ष कारावास आणि १० लाखांचा दंड. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची फसवणूक भोवली;न्यायालयाने सुनावली कडक शिक्षा.
अंबाजोगाई/ प्रतिनिधी: ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या करारापोटी घेतलेली उचल न फेडता, दिलेला धनादेश (चेक) अनादरित झाल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. आरोपी विलास श्रीमंत भोरे (रा. वाढवणा, ता. जि. बीड) याला १ वर्ष सश्रम कारावास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २००८-०९ साठी ऊस तोडणी व वाहतूक मुकादमांशी करार करण्यास सुरुवात केली होती. यावेळी आरोपी विलास भोरे याने स्वतः वाहन मालक असल्याचे सांगून ३ ऑक्टोबर २००८ रोजी कारखान्याशी करार केला. या करारापोटी त्याने कारखान्याकडून ३ लाख ५० हजार रुपये उचल घेतली होती. हंगाम संपल्यानंतर आरोपीने केवळ ९० हजार रुपयांची परतफेड केली. उर्वरित २ लाख ६० हजार रुपये मुद्दल आणि त्यावरील २ लाख ३४ हजार रुपये व्याज अशी एकूण ४ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी त्याच्याकडे शिल्लक होती. ही रक्कम देण्यासाठी आरोपीने ‘अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक’चा धनादेश (क्र. ६२६३२७) कारखान्याला दिला होता. न्यायालयीन लढाई आणि निकाल कारखान्याने सदर धनादेश बँकेत भरला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने १४ डिसेंबर २०१३ रोजी तो ‘बाउन्स’ झाला. कारखान्याचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण मेटे यांच्यामार्फत नोटीस बजावूनही आरोपीने पैसे न दिल्याने न्यायालयात खटला (S.S.C. क्र. १००/२०१४) दाखल करण्यात आला. या प्रकरणात कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे आणि गोवर्धन पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फिर्यादी पक्षाचा लेखी व तोंडी पुरावा तसेच ॲड. प्रवीण मेटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी ५ मे २०२६ रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला. शिक्षेचे स्वरूप: कारावास: १ वर्ष. दंड: १० लाख रुपये (ही रक्कम फिर्यादी कारखान्याला नुकसान भरपाई म्हणून द्यायची आहे). दंड न भरल्यास: अतिरिक्त ३ महिने कारावास. या प्रकरणात कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे, गोवर्धन मनोहर पवार आणि विधीज्ञ प्रवीण मेटे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.