बीडमध्ये पटपडताळणीचा ‘फार्स’ की प्रत्यक्ष कारवाई? तपासणी पथकांने ‘बंद पॉकेट’ घेतल्याचे आरोप; शिक्षण वर्तुळात चर्चांना उधाण!
बीड | प्रतिनिधी: जिल्ह्यातील अडीच हजार शाळांची ‘विशेष पटपडताळणी’ आज तिसऱ्या दिवशीही सुरू असतानाच, दुसरीकडे या मोहिमेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले” अशा बातम्या येत असतानाच, प्रत्यक्षात काही शाळांमध्ये तपासणी पथकांनी ‘अर्थपूर्ण’ तडजोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक चर्चा जिल्ह्याच्या शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे. १४, १५ आणि आज २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात १०० पथकांमार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी शाळा प्रशासनाने आपली शिक्षक पदे वाचवण्यासाठी तपासणी अधिकाऱ्यांचे ‘बंद पाकिटात’ स्वागत केल्याचे आरोप होत आहेत. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती, तिथे ही पाकिटे पोहोचल्यानंतर आकड्यांची जुळवाजुळव करण्यात आल्याची चर्चा आहे. या गंभीर बाबीची वरिष्ठांनी दखल घेण्यात यावी अशी जिल्हाभरातून मागणी होत आहे. ’पाठलाग न्यूज’ कडून काही उपस्थित केलेल्या कळीच्या मुद्द्यनुसार ६० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांना वगळल्याने मोठ्या खासगी शाळांनी पथकांना खुश करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे का? काही तालुक्यांत ठरलेल्या वेळेपेक्षा पथके उशिरा पोहोचली किंवा लवकर निघाली, यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? डिजिटल पुराव्यांचे काय?: शासनाने फोटो आणि व्हिडिओ घेण्याचे आदेश दिले असले तरी, प्रत्यक्षात किती पथकांनी त्याचे पालन केले, की केवळ स्वाक्षऱ्या घेऊन गाशा गुंडाळला? सामान्य जनतेतून संताप ”जिल्ह्यात एकीकडे ‘शालार्थ आयडी’चे घोटाळे गाजत असताना दुसरीकडे पटपडताळणीतही जर भ्रष्टाचाराची वाळवी लागली असेल, तर गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?” असा संतप्त सवाल पालक विचारत नियुक्त एसआयटीने या गंभीर बाबीकडे देखील लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी असा सर्वसामान्यांचा सूर आहे . भ्रष्टाचार करणाऱ्या अशा शाळांवर आणि मॅनेज होणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एसीबी’ (ACB) ने पाळत ठेवावी, अशी ही मागणी आता जोर धरत आहे. शिक्षण विभागाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मोहीम पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर किती शाळांवर प्रत्यक्ष कारवाई होते आणि किती ‘बोगस’ पटसंख्या कमी होते, यावरच या मोहिमेचे यश अवलंबून आहे. पाठलाग न्यूज चा इशारा: पटपडताळणीच्या नावाखाली जर कुणी भ्रष्टाचाराचा खेळ मांडला असेल, तर ‘पाठलाग न्यूज’ अशा प्रवृत्तींचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. लवकरच या प्रकरणातील काही धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.