केज तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू ‘अपघात’ की ‘घातपात’?तपास आता गुन्हे शाखेकडे;’त्या’ रहस्यमय व्यक्तीच्या शोधासाठी पोलिसांची चक्रे फिरली!
केज: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या भीषण कार अपघाताचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले असून, आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेतील संशयास्पद बाबी लक्षात घेता, लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाचा तपास रेणापूर पोलिसांकडून काढून थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग केला आहे. यामुळे या मृत्यूमागे घातपाताचीच शक्यता बळावली आहे. तपासातील ४ महत्त्वाचे संशयास्पद दुवे: १. वाहनांची अदलाबदल – सर्वात मोठा धक्का: सीसीटीव्ही फुटेजमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बुधवारी (दि. ८) सांयकाळी साडेआठ वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सेलूंअबा टोलनाका ओलांडताना जी कार कॅमेऱ्यात कैद झाली आणि सेलू आंबा टोल नाका ते साडे तीन तासाच्या अवधी नंतर ज्या कारचा रेणापूरजवळ अपघात झाला, त्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रवासादरम्यान तहसीलदार गिड्डे यांनी साडेतीन तासाच्या अवधी नंतर कार का बदलली? हे साडेतीन तास तहसीलदार गिड्डे नेमके कुठे होते आणि काय करत होते? या काळात त्यांच्या सोबत कोण कोण होते? हा प्रश्न आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. २. अंगावर पांढरे चट्टे असलेली अनोळखी ‘एक्स’ व्यक्ती कोण?: टोलनाक्यावरील फुटेजमध्ये तहसीलदार गिड्डे यांच्या बाजूच्या सीटवर एक अंगावर पांढरे चट्टे असलेली अनोळखी व्यक्ती सिसी टव्ही फुटेज मध्ये बसलेली स्पष्ट दिसत आहे. मात्र, अपघातानंतर घटनास्थळी केवळ गिड्डे यांचाच मृतदेह आढळला. प्रवासात सोबत असलेली ती ‘दुसरी रहस्यमय व्यक्ती’ अपघातानंतर अचानक गायब कशी झाली? ती व्यक्ती जिवंत आहे की तिला मुद्दामहून तिथून हटवण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. ३. साहित्याची चोरी: अपघातानंतर घटनास्थळावरून तहसीलदार गिड्डे यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब झाले आहेत. अपघातात एखादी वस्तू हरवणे शक्य आहे, पण सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे गायब होणे हे नियोजित कटाकडे इशारा करत असल्याची चर्चा आहे. ४. दुसरी कार सोबतीला होती का?: पोलिसांना असा संशय आहे की, प्रवासादरम्यान दुसरी एखादी कार त्यांच्या पाठलागावर होती किंवा त्यांच्या मदतीला होती का? कार बदलण्याचा निर्णय हा दबावाखाली घेतला होता का, या दिशेने पोलीस निरीक्षक सुधाकर भावसार अधिक तपास करत आहेत. कुटुंबीयांची मागणी आणि पोलीस कारवाई- तहसीलदार राकेश गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली होती. प्रशासकीय वर्तुळात अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिड्डे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ”केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. घटनाक्रम आणि अपघात अशा दोन्ही बाजूंची पडताळणी केली जात असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल.” — अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर गुन्हे शाखेने आता टोलनाका ते अपघात स्थळ या दरम्यानच्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, बीड च्या जिल्हाधिकारी यांनी देखील घटना स्थळाला भेट दिल्याचे कळते. तहसीलदार गिड्डे यांच्या संपर्कातील शेवटच्या काही व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.