बीड/विशेष प्रतिनिधी: नाशिक विभागाला हादरवून सोडणारा १५० कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा आता मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राचा पाया हादरवण्यास सज्ज झाला असून,नाशिक पाठोपाठ आता बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेकडो बोगस शिक्षक आणि भ्रष्ट संस्थाचालकांचे धाबे दणाणले असल्याचे स्पष्ट चित्र प्रशासकीय हलचालीवरुन दिसत आहे.नाशिक धर्तीवर या भयानक प्रकरणात आता थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाईची तयारी सुरू झाल्याने शिक्षण विभागातील मोठ्या ‘माशांचे’ आणि भ्रष्टाचारी संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी, अम्बाजोगाई, माजलगाव आणि केज तालुक्यातील सर्वाधिक शिक्षण संस्था ‘SIT’ च्या रडारवर दिसत आहेत. केज तालुक्यातील एका बड्या व आदर्श समजल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेसह बीड जिल्ह्यातील सुमारे ४० ते ५० माध्यमिक शाळांची विशेष तपासणी सुरू आहे. २०१२ च्या भरती बंदीनंतरही मागील तारखेत (Backdated) नियुक्त्या दाखवून, डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून हे आयडी मिळवण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. संस्थाचालक व आधिकारी यांच्या सन्गनमताने एका शालार्थ आयडीसाठी १५ ते २५ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. बनावट संचमान्यता, तुकड्यांची बोगस वाढ आणि जाहिरात न देताच केलेली भरती या मार्गांनी हे आयडी मिळवण्यात आले. नाशिकमधील अटकेत असलेल्या दलालांचे धागेदोरे बीडमधील काही माजी शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपीकांशी जोडले गेल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.आणि त्यानुसारच तपासाची चक्रे फिरत आहेत. संघटित गुन्हेगारी सिद्ध झाल्यास मुख्य सूत्रधारांवर मकोका लावला जाणार आहे. बीडमधील सुमारे ८० हून अधिक शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्या बोगस पगाराची वसुली सरकार करणार असल्याचे निश्चित आहे. अल्पसंख्याक संस्थांची चौकशी: पवित्र पोर्टल टाळून भरती केलेल्या अल्पसंख्याक शाळांचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे.लातूर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही डिजिटल स्वाक्षऱ्यांचा (DSC) वापर करून बोगस आयडी ‘अॅप्रुव्ह’ केल्याचा संशय असल्याने, लातूर आणि धाराशिवमधील काही बड्या संस्थाचालकांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. या घोटाळ्यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला असून, आता ‘SIT’ च्या कारवाईत नेमके कोणते बडे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘पाठलाग न्यूज’ या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत असून, लवकरच संबंधित संस्थांची नावे जाहीर केली जातील.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.