केज तालुक्यातील बनकरंजा येथील ४८ लाखांच्या बोगस पूल प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी;
संतप्त अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला झापले, दर्जेदार कामाशिवाय बिल न देण्याची कडक ताकीद!
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे!
जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव थेट बनकरंज्यात दाखल; केली पुलाची प्रत्यक्ष पाहणी.
मग्रुर गुत्तेदाराचा अधिकाऱ्यांसमोरच उलट सवाल; जनतेतून गुन्हे दाखल करण्याची मागणी!
बीड/केज: केज तालुक्यातील बनकरंजा येथे बांधण्यात आलेला ४८ लाख रुपयांचा पूल किती निकृष्ट आणि बोगस दर्जाचा आहे, हे गावातील धाडसी तरुण दुर्गादास लांब याने एका लाथेत पुलाचा निकृष्ट भाग पाडून दाखवून दिले होते.प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच संपूर्ण जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. वृत्ताची दखल घेत दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे स्वतः तातडीने बनकरंजा गावात दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या समक्ष पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नकाशात स्टील, पुलात मात्र फक्त माती आणि सिमेंट! पाहणी दरम्यान गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिले की, पुलाच्या कामात एस्टीमेटप्रमाणे स्टीलचा (लोखंडाचा) वापर अत्यंत नगण्य किंवा अजिबात करण्यात आलेला नाही. संपूर्ण पूल स्टील न वापरता उभा केल्याचे समोर आल्यावर अधिकाऱ्यांनीही तीव्र आश्चर्य व्यक्त केले. ”अजून काम कुठं पूर्ण झालंय?” – अधिकाऱ्यांसमोरच गुत्तेदाराची मग्रुरी! पाहणीसाठी पुलाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला (गुत्तेदाराला) घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न पडावा असे वर्तन या गुत्तेदाराने केले. थेट तोंडवर सांगून त्याने अधिकाऱ्यांसमोरच उद्धटपणे प्रतिप्रश्न केला, “अजून काम कुठं पूर्ण झालंय?” संपूर्ण पुलाचे बांधकाम उभे राहिल्यानंतर आता स्टील कुठे वापरणार? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संतप्त अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला झापले! गुत्तेदाराच्या या मग्रुरीवर संतप्त झालेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला सर्वांसमक्ष चांगलेच झापले. या कामाचा अहवाल तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार असून, “संपूर्ण काम नियमानुसार गुणवत्तेचे झाल्याशिवाय कंत्राटदाराचे बिल अदा केले जाणार नाही” अशी कडक ताकीद अधिकाऱ्यांनी दिली. ’पाठलाग न्यूज’ची भूमिका व जनतेची मागणी: ४८ लाख रुपयांच्या सार्वजनिक निधीची अशा प्रकारे वाट लावणारा आणि शासकीय अधिकाऱ्यांसमोर मग्रुरी दाखवणाऱ्या या उद्धट गुत्तेदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा आणि त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा, हीच आता बनकरंजातील संतप्त गावकऱ्यांची आणि संपूर्ण बीड जिल्ह्याची मागणी आहे!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.