हॉटेल, भोजनालये आणि रेस्टॉरंट चालकांसाठीअन्न औषध व प्रशासन विभागाचा मोठा आदेश;नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई.
विशेष प्रतिनिधी/मुंबई: राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा आणि खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासना चे राज्य आयुक्त यांनी एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि स्वीट होम्स व खाद्यगृहांना या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. FDA ने जारी केलेले प्रमुख नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत: मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीवर बंदी: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. परवान्याची प्रत दर्शनी भागात लावणे बंधनकारक: व्यवसायाचा अधिकृत परवाना (License) ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी (दर्शनी भागात) लावणे अनिवार्य आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे प्रशिक्षण आवश्यक: सर्व हॉटेल चालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचे (Food Safety & Hygiene) आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी: हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी (Annual Medical Check-up) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अन्नपदार्थांची नियमित प्रयोगशाळा चाचणी: खाद्यपदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी त्यांची वेळोवेळी प्रयोगशाळेत (Laboratory) चाचणी करून घ्यावी लागणार आहे. स्वयंपाकघर आणि अन्न साठवणुकीसाठी कडक नियम: हॉटेलचे स्वयंपाकघर (Kitchen) आणि अन्न साठवून ठेवण्याची जागा (Storage) येथे स्वच्छतेचे कडक नियम पाळावे लागतील. अॅलर्जीकारक घटकांची माहिती देणे अनिवार्य: ग्राहकांना आरोग्याचा त्रास होऊ नये म्हणून खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या ॲलर्जीकारक घटकांची (Allergens) माहिती देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. नियम न पाळल्यास कठोर कारवाई! FDA ने स्पष्ट केले आहे की, हे आदेश राज्यातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालय, स्वीट होम्स, ढाबे, आणि खाद्यगृहांना तातडीने लागू होत आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर प्रशासनातर्फे कडक आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही प्रशासनाने दिला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.