ताज्या घडामोडी

​केज येथील व्यवसाय शिक्षक सूर्यकांत वाघमारे यांची गळफास लावून आत्महत्या; केज परिसरात सर्वत्र हळहळ.

पाठलाग न्यूज /प्रतिनिधी :

​केज येथील व्यवसाय शिक्षक सूर्यकांत वाघमारे यांची गळफास लावून आत्महत्या; केज परिसरात सर्वत्र हळहळ.

​केज/प्रतिनिधी: केज शहरात वास्तव्यास असलेल्या एका उच्चशिक्षित व मनमिळावू शिक्षकाने चिंचोली फाट्याजवळ लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक व अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. सूर्यकांत बाळासाहेब वाघमारे (वय ४१, रा. लहुरी, ह.मु. शाहूनगर, केज) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह केज शहर व परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, सर्व स्तरांतून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूर्यकांत वाघमारे हे केज तालुक्यातील कुंभेफळ येथील सिद्धी विनायक विद्यालयात ‘व्यवसाय शिक्षक’ म्हणून कार्यरत होते. मंगळवार, दिनांक ९ जून २०२६ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रस्त्यावरील चिंचोली फाट्या नजीक असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. मात्र, त्यांच्या या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. ​@पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा ​–या घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना मिळताच, त्यांनी तातडीने पावले उचलली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे व बीट अंमलदार हेड कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेचा पुढील तपास केज पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत. ​सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी ​मृत सूर्यकांत वाघमारे हे अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. सदरील शिक्षक शासनाला सहकार्य म्हणून जनगणनेचे काम देखील करत होते. त्यांच्या याच चांगल्या स्वभावामुळे केज शहर व परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने त्यांच्या मित्रपरिवाराला व शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ​त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा मोठा आणि हसता-खेळता परिवार आहे. एका जबाबदार आणि सुविद्य कुटुंबप्रमुखाने असे अचानक टोकाचे पाऊल उचलल्यामुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये