केज/ क्राईम प्रतिनिधी: दोन वर्षांपूर्वी केज शहरातील क्रांतीनगर भागात झालेल्या अत्यंत क्रूर आणि थरारक गोरख महावीर हजारे खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने त्याला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. न्यायाधीशांच्या या दणक्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एका क्षुल्लक वादातून गळा चिरला! काय घडले होते त्या काळ्या रात्री? घटना २३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. केज येथील वसंत विद्यालया जवळील क्रांतीनगर परिसरात अवघ्या १८ वर्षांचा तरुण गोरख महावीर हजारे आणि आरोपी सन्नी लांडगे यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी ‘तुला बघून घेतो’ अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तिथून निघून गेला. पण, आरोपीच्या डोक्यात खुनाचे भूत स्वार होते! काही वेळातच सन्नी लांडगे हा शर्टमध्ये धारदार शस्त्र लपवून परत आला. काही समजण्याच्या आत त्याने गोरख हजारे याच्या गळ्यावर सपासप वार केले! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोरखला नातेवाईकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या हत्येमुळे संपूर्ण केज परिसर हादरून गेला होता. पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’; शेतातून मुसक्या आवळल्या! घटनेचे गांभीर्य ओळखून केज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हत्येनंतर फरार झालेल्या सन्नी लांडगेचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला.
अखेर बोबडेवाडी येथील एका शेतात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोर्टात सरकार पक्षाचा युक्तिवाद ठरला वरचढ! हा खटला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर. के. शेख यांच्या न्यायालयात चालला. गोरखला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. राम बिरंगळ यांनी आक्रमक बाजू मांडली. ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ठोस पुरावे घटनास्थळाचे कायदेशीर दस्तऐवज या सर्वांच्या आधारे अॅड. राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने तंतोतंत ग्राह्य धरला. त्यांना अॅड. रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.गुन्हेगारांना जरब बसवणारा निकाल! फिर्यादी राज संजय गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या निष्पाप गोरख हजारेच्या खुन्याला न्यायालयाने कोणतीही दया न दाखवता थेट कोठडीच्या अंधारात धाडले आहे. केज न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वसामान्यांमधून स्वागत होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हा एक मोठा इशारा मानला जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.