प्रतिनिधी/ केज :- प्रशासनात अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा लाचखोरीचा धुमाकूळ चालू असतानाच, शेत जमिनीच्या मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून, त्यातील ₹१०,०००/- रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना केज येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका लिपिकाला जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आसून. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना व बीड यांनी ही कारवाई केल्याने बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, केज, जि. बीड येथील लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे वय ५० वर्षे याने तक्रारदार शेतकरी त्यांच्या जमिनीच्या हद्द कायम करून जमीन क्षेत्र मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय, केज येथे अर्ज केला होता. आरोपी लोकसेवक माणिक वाघमारे याने दि.१८.१२.२०२५ रोजी मोजणी केली होती. केलेल्या मोजणीनुसार क्षेत्राची घट न दाखवता फाईल निकाली काढण्याच्या मोबदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे ₹३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी दि. २९.१२.२०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आरोपीने ₹३०,०००/- रुपयांच्या मागणीची पुष्टी केली. त्यापैकी ₹५,०००/- रुपये त्याने यापूर्वीच स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ₹२५,०००/- रुपयांपैकी ₹१०,०००/- रुपयाचा एक हप्ता आज रोजी स्वीकारताना आरोपीला केज तहसील कार्यालयासमोर, केज-बीड रोडवरील एका चहाच्या टपरीसमोर सापळा रचून रंगे हात पकडण्यात आले आले. या वेळी आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेची रक्कम ₹१०,०००/- रुपये, इतर रोख ₹५,५००/- रुपये, मोबाईल व दोन अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान आरोपीच्या धाराशिव येथील निवासस्थानाची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस स्टेशन केज येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यत आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर श्रीमती माधुरी कांगणे, आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे (जालना), पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवर (जालना), तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, समाधान कवडे (बीड), पो.ह. गजानन घायवट, पो.ना.गजानन खरात, पो.अं. गजानन कांबळे, चालक विठ्ठल कापसे आदीच्या पथकाने केली. कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.