विडा येथील आठवडी बाजारातून भरदिवसा अल्पवयीन मुलीचे अपहरण; केज पोलिसात गुन्हा दाखल, परिसरात खळबळ.
केज / प्रतिनिधी: समाजामध्ये दिवसेंदिवस अनितीची प्रवृत्ती आणि गुन्हेगारांचे मनोबल किती टोकाला गेले आहे, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा कसलाच धाक उरलेला नसल्याचे चित्र असून, विडा येथील शनिवारच्या गजबजलेल्या आठवडी बाजारातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे भरदिवसा (दिन दहाडे) अपहरण करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरबाजारातून पळवून नेले मिळालेल्या माहितीनुसार, विडा येथे शनिवारचा आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी होती. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही १५ वर्षीय पीडित मुलगी बाजारात आली असताना, अज्ञात आरोपीने तिचा माग काढत तिला फूस लावून किंवा बळजबरीने अज्ञात कारणासाठी तिथून पळवून नेले. शोध घेतला, पण… मुलगी बाजारात गेल्यानंतर बऱ्याच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि विडा परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर अनर्थ घडल्याचे लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने थेट केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून तातडीने तपास सुरू या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात नराधम आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून केज पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे हे करत असून, पोलीस अज्ञात आरोपीचा आणि मुलीचा कसून शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे विडा आणि केज परिसरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा नराधम गुन्हेगाराला पोलिसांनी लवकरात लवकर बेड्या ठोकून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.