केज: महावितरण विभागातील आपल्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कनिष्ठ शाखा अभियंता शितल सय्यद यांनी अखेर न्यायालयीन लढाईत मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्यावर राजकीय दबावातून झालेल्या अन्यायकारक बदली आदेशाला माननीय न्यायालयाने स्थगिती (स्टे) दिली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर सय्यद मॅडम आज पुन्हा एकदा केज महावितरण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्या आहेत. शितल सय्यद मॅडम यांनी केज महावितरणचा पदभार घेतल्यापासून थकीत वीज बिल वसुली आणि अवैध वीज चोरी विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या या कडक कार्यपद्धतीमुळे नियमबाह्य कामे करणाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले होते.परिणामी, महावितरण कार्यालयातीलच काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या छुप्या विरोधातून आणि राजकीय दबावातून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. नागरिकांचा मोठा पाठिंबा: एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर केवळ दबावापोटी झालेल्या या कारवाईमुळे केज शहरातील सुजाण नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता,आणि नागरिकांनी या बदलीला जाहीर विरोध केला होता. आपल्यावरील अन्यायाविरोधात सय्यद मॅडम यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन या बदलीला स्थगिती दिली. ’पाठलाग न्यूज’ विशेष मत: शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि राजकीय दबावाचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींना न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे एक मोठी चपराक आहे. शितल सय्यद मॅडम पुन्हा रुजू झाल्यामुळे केजमधील प्रामाणिक ग्राहक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, वीज चोरांवर पुन्हा एकदा कायद्याचा बडगा उगारला जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.