बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांना मानाचा ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ प्रदान .
ग्रामीण भागातील रुग्णसेवेचा गौरव; ‘लोकमत’ समूहाकडून केजच्या सुपुत्राचा सन्मान.
केज : वैद्यकीय क्षेत्रातील समर्पण आणि ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल केज जि. बीड येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांना लोकमत समूहाच्या वतीने अत्यंत मानाचा ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले असून, आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात आरोग्याची मशाल पेटवणाऱ्या डॉ. राऊत यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी केज येथे सर्व सोयीनियुक्त रुग्णालयाची उभारणी केली.वैद्यकीय शिक्षणाची आवड असलेल्या डॉ. राऊत यांनी नोव्हेंबर २००४ मध्ये केज येथील वकीलवाडी भागात एका छोट्याशा जागेत ‘योगिता बाल रुग्णालय’ सुरू केले. सुरुवातीला आर्थिक अडचणींमुळे खाजगी लोकांकडून व्याजाने पैसे काढून त्यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गरीब रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळवून देणे, हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. आज हे रुग्णालय मराठवाड्यातील एक सुसज्ज आणि अद्ययावत रुग्णालय म्हणून ओळखले जाते. डॉ. राऊत केवळ उपचारच करत नाहीत, तर त्यांनी दुर्धर आजारांवर सखोल संशोधनही केले आहे. त्यांचे ‘A diagnostic dilemma in an infant’ आणि ‘Thinking beyond sepsis’ हे दोन महत्त्वपूर्ण शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर राऊत यांनी आजपर्यंत १ किलोपेक्षा कमी वजन असलेल्या सुमारे ६०० पेक्षा जास्त बालकांना यशस्वी उपचार देऊन जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २४ आठवड्यांत जन्मलेल्या (Premature) बालकावर त्यांनी यशस्वी उपचार केले असून, ते बाळ आज ५ वर्षांचे असून पूर्णपणे सुदृढ आहे. ही कामगिरी ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रासाठी एक चमत्कारच मानली जाते. भविष्यातील ध्येय: मल्टीस्पेशालिटी रुग्णालय पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. राऊत यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांप्रमाणे सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी ‘मल्टीस्पेशालिटी रुग्णालय’ उभारण्याचा आपला मानस व्यक्त केला. ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी हेळसांड थांबवणे, हेच माझे आयुष्यभराचे कार्य असेल, असेही त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून नमूद केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.