Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 शिक्षक निलंबित!!

कोल्हापूर जिल्ह्यातील 53 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू.
दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ही कडक कारवाई करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र : दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन शिक्षकाची नोकरी मिळवलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तूर्तास 3 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच 13 शिक्षकांचे निलंबन करण्यात आल्यामुळे शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राज्याचे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई देखील दिव्यांग आणि आजारी प्रमाणपत्राबाबत बोगसगिरी उघड झाल्याने करण्यात आली आहे. तर अद्याप उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांची चौकशी केली जात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभांवर बोगस दिव्यांगांकडून डल्ला मारला जात आहे. या प्रकारामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होताना दिसत आहे. यामुळे असे प्रकार रोखण्यासह बोगस दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले असून थेट दोषी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करावे असे आदेशच मुंडे यांनी दिले आहेत. या निर्णायामुळे शिक्षण खात्यात भूकंप आला असतानाच कोकणात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते लाटणाऱ्या 3 प्राथमिक शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील महावीर मिसाळ, प्रदीप मोरे, राजेश भंडारे या शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे,तर प्रशासनाने केलेल्या चौकशीत निलंबित केलेल्या शिक्षकांकडे शारीरिक व्यंगाच्या प्रमाणापेक्षा जास्त टक्केवारी दाखवणारी बोगस प्रमाणपत्रे मिळाली होती. त्यामुळे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या तीन प्राथमिक शिक्षकांची तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. या निलंबनामुळे शिक्षण खातं हादरलं असून,अशातच आता अशीच कारवाई कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली असून तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले. गेली दोन महिने याबाबत चौकशी सुरू होती. प्रशासनाने केलेल्या चौकशीत या शिक्षकांनी येथील सीपीआर रुग्णालयासह इतर ठिकाणाहून घेतलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे चुकीची असल्याची आढळली आहेत. सोयीच्या ठिकाणी बदल्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांचा वापर केल्याची चर्चा सुरू होती. तसेच शिक्षकांनी बोगसगिरी करत दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांसाठी राजकीय दबावाचा वापर केल्याचीही कुजबूज सुरू होती. यावरूनच जिल्ह्यातील 355 शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली. ज्यात तब्बल २६ प्राथमिक शिक्षक दोषी आढळले. तर ३०२ शिक्षकांचे अहवाल योग्य असल्याचे समोर आले. तर उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांबाबत सध्या चौकशी केली जात आहे. दरम्यान या २६ शिक्षकांनी बोगसगिरी करत सीपीआरकडून दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रे मिळवल्याचे उघड झाले आहे. त्यातील चार शिक्षकांवर नोव्हेंबर २०२५ मध्येच कारवाई करण्यात आली असून आणखी १८ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी चौघांनी खुलासे केले असून ते जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले आहेत. तर एकाचे प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी पुन्हा सीपीआरकडे पाठविण्यात आला आहे.पण १३ शिक्षक प्राथमिक चौकशीत बोगस प्रमाणपत्रे घेतल्याने दोषी ठरले आहेत. या सर्व शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून,त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे शिक्षक पालकमंत्री असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांच्या भुदरगड तालुक्यासह राधानगरी, कागल, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत. दरम्यान प्रशासनाने केलेल्या चौकशीत आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले असून सीपीआरच्या नेत्रोपचार विभागाने त्यांना दिलेले नमुने मुंबईतील जे. जे. आणि ससून रुग्णालयास पाठवण्यात आले आहेत. ते अहवाल प्रलंबित असून त्या तपासण्या अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे ते लवकर देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असून ते १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभरात विविध खात्यामध्ये दिव्यांगाची प्रमाणपत्रे घेऊन बोगस नोकऱ्या मिळवून कार्यरत आहेत, यथावकाश त्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती दिव्यांग विभागामार्फत देण्यात आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये