पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंड द्यावा’ म्हणणाऱ्या प्रा. मोटेगांवकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; आता स्वतःच सीबीआयच्या जाळ्यात.
विशेष प्रतिनिधी/ लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET (नीट) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आले आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (रेणुकाई करिअर सेंटर) कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगांवकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. या अटकेनंतर सोशल मीडियावर प्रा. मोटेगांवकर यांचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आणि विद्यार्थी-पालकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडिओमध्ये प्रा. शिवराज मोटेगांवकर NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर अत्यंत भावूक होऊन आपली खंत आणि संताप व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणतात: ”NEET चा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य वेदना होतात. पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंड किंवा आजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे. अशी कडक शिक्षा करून तिची तात्काळ अंमलबजावणी व्हायला हवी.” एकीकडे पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करणारे मोटेगांवकर आज स्वतःच त्याच पेपरफुटीच्या गंभीर आरोपाखाली सीबीआयच्या कोठडीत गेल्यामुळे सोशल मीडियावर “दुटप्पीपणा” म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. ‘परभणी जन मन’ या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यावर ‘आधीचे वक्तव्य आणि आताची कृती’ यावरून युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर पुण्यातील तपासादरम्यान समोर आलेल्या धाग्यादोरऱ्यांवरून सीबीआयच्या पथकाने प्रा. मोटेगांवकर यांची दीर्घ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटेगांवकर यांच्या संस्थेने घेतलेल्या ‘मॉक टेस्ट’मधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य NEET परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा संशयास्पद प्रकार तपासात समोर आला आहे. या प्रश्नांचे थेट कनेक्शन पेपरफुटीच्या टोळीशी असल्याचा संशय सीबीआयला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून परीक्षा दिली, त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआय आता मोटेगांवकर यांची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी किती खोलवर पसरले आहेत, हे आगामी चौकशीत स्पष्ट होईल.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.