विद्यार्थी- पालकप्रेमी “शिक्षक” हीच बालासाहेब चाटे यांची खरी ओळख; उपस्थितांनी गौरवला ३८ वर्षांचा निष्कलंक प्रवास.
केज: ३८ वर्षांच्या प्रदीर्घ,सेवाभावी आणि शिस्तबद्ध शैक्षणिक कारकिर्दीत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे मैंदवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बालासाहेब गिन्यानदेव चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा केज तालुक्यातील तांबवा येथील तांबवेश्वर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अत्यंत भावूक वातावरणात पार पडला. सेवेच्या शेवटच्या दिवशीही वर्ग घेऊन अध्यापनाचे कर्तव्य बजावणाऱ्या चाटे गुरुजींचा उपस्थितांनी ‘आदर्श अन् कर्तव्यनिष्ठ शिक्षक’ अशा शब्दांत गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय कोकणे हे होते. तर उपस्थितांमध्ये डॉ.अशोक थोरात, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, ईश्वर मुंडे, सोमनाथ माने, केजच्या नगराध्यक्षा सीताताई बन्सोड, केज नगरपंचायत चे सर्वेसर्वा हारूनभाई इनामदार, केज अंबाजोगाई विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ नेते नंदू काका मुंदडा यांचे खंदे समर्थक तथा भाजपाचे व्यापारी महासंघ नेते महादेव सूर्यवंशी, कक्ष अधिकारी अश्विनी चाटे, दत्तात्रय चौरे, दत्तात्रय चाटे, सुदर्शन काळे, संजय चौरे तसेच आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा सचिव महादेव ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालासाहेब चाटे सर यांचा त्यांच्या धर्मपत्नीसह शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन भावूक वातावरणात सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. पुढील निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी चाटे पती-पत्नीला शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्याशी एकनिष्ठ!”सेवेच्या शेवटच्या दिवशीही दुपारी ३ ते ४:३० या वेळेत वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणारे चाटे गुरुजी खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा जपणारे आदर्श शिक्षक आहेत.” — उपस्थितांचे प्रतिपादन ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात बालासाहेब चाटे यांनी केवळ अध्यापनाचे कार्य केले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांना संस्कारित करून विविध क्षेत्रांत घडवले. त्यांच्या या अखंड ज्ञानयज्ञाची दखल घेत व्यासपीठावरील वक्त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन आणि शालेय उपक्रमांमधील सक्रिय सहभाग हीच त्यांची खरी ओळख राहिल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले. या सेवापूर्ती सोहळ्यास तालुक्यातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ तसेच चाटे गुरुजींचे स्नेही-सोबती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.