ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई आणि २ लाखांच्या रिकव्हरीसाठी तरुण आक्रमक;खासदार बजरंग सोनवणे यांची उपोषणस्थळी भेट.
केज / बीड (विशेष प्रतिनिधी): केज तालुक्यातील देवगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये चालू असलेल्या आणि झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात देवगावच्या ग्रामस्थांनी व तरुणांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. बुधवारी गावात हालगी व संबळ वाजवत आणि गाजत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा आज तिसरा दिवस असून,आंदोलनकर्ते बेमुदत आमरण उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान, बीडचे खासदार बजनंग बप्पा सोनवणे यांनी उपोषणस्थळी आज प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली व जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) याप्रकरणी कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, देवगाव येथील गणेश अर्जुन मुंडे व बालासाहेब रामहारी मुंडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी केज पंचायत समितीसह वरिष्ठ कार्यालयाकडे देवगाव ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेऊन केज पंचायत समितीच्या चौकशी पथकाने अहवाल सादर केला. या चौकशी अहवालानुसार: कचराकुंड्या गायब: १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये खरेदी केलेल्या रु. २,००,०००/- (दोन लाख रुपये) च्या कचराकुंड्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आल्या नाहीत.नोंदी व रजिस्ट्रार गायब: साठा नोंद रजिस्टर / नमुना नं. १६ ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून आले, ज्यामुळे साहित्याची पडताळणी करता आली नाही. रिकव्हरीचा आदेश: चौकशी समितीने ग्रामसेवक व सरपंचांना दोन लाख रुपयांची रिकव्हरी भरण्याचे आदेश दिले होते, तरीही संबंधित ग्रामसेवक व सरपंचांनी ती रक्कम भरली नाही. आई महालक्ष्मी सणाच्या दिवशीही उपोषण; आक्रमक मागण्या स्थानिक पातळीवर वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने, आई महालक्ष्मीच्या (ज्येष्ठा-कनिष्ठ) सण-उत्सवाच्या काळातही कौटुंबिक आनंद बाजूला ठेवून देवगावचे तरुण व कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. १६ सप्टेंबर (बुधवार) पासून सुरु झालेल्या या आंदोलनात तरुणांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: निलंबन व फौजदारी गुन्हे: २ लाख रुपये रिकव्हरी वसूल करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.दस्तऐवज सील करून सखोल ऑडिट: सन २०२२ ते २०२६ या कालावधीत देवगाव ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या सर्व निधीच्या कामांचे दस्तावेज (रेकॉर्ड) सील करून वरिष्ठ लेखापरीक्षकांमार्फत (Audit) सखोल चौकशी करण्यात यावी.प्रत्यक्ष कारवाईचे आदेश: केवळ आश्वासने न देता प्रशासनाने तात्काळ ठोस आदेश निर्गमित करावेत. उपोषणात सहभागी कार्यकर्ते व ग्रामस्थ– या आमरण उपोषणात गणेश अर्जुन मुंडे, बालासाहेब रामहारी मुंडे, बंडू नामदेव मुंडे, रामेश्वर तुकाराम नागरगोजे, बापू नामदेव मुंडे, पांडुरंग रामा मुंडे, ग्रा.पं. सदस्य छंदर रामा मुरकुटे, अशोक निवृत्ती मुंडे यांच्यासह देवगाव येथील अनेक तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता बीड जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासन या भ्रष्ट कारभारावर काय कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्यासह केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.