कोट्यवधींच्या गैरप्रकारातला आरोपी जेरबंद: केज पोलिसांची कराडमध्ये मोठी कारवाई. पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन!
केज (बीड): संभाजीनगरच्या एटीएस युनिटने केज माजलगाव मध्ये धार्मिक बोगस ट्रस्ट स्थापन करून समाजाची कोट्यावधी ची केलेली फसवणूक प्रकरणी केलेली कारवाई ताजी व चर्चेतअसतानाच सुमारे ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला केज पोलिसांनी कराड (जि. सातारा) येथून अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास एका खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना ही कारवाई करण्यात आली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार: डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (रा. सोनिमोहा, ता. धारूर). ते सध्या बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अशी तक्रार दिली होती की, आरोपी सौरभ कुलकर्णी याची डॉ. तोंडे यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने त्यांना ‘मॅनेजमेंट कोठ्यातून’ एमडी मेडिसिन (MD Medicine) ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एमडी पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांची फी ९९ लाख रुपये असल्याचे सांगून ६५ लाखांत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन आरोपी सौरभ कुलकर्णी ने दिले. यासाठी आरोपीने डॉ. तोंडे यांच्याकडून रोख आणि फोन-पे द्वारे एकूण ८ लाख रुपये घेतले. हा व्यवहार झाल्यानंतर जेव्हा पहिल्या यादीत डॉ. तोंडे यांचे नाव निवड यादीत आले नाही, तेव्हा त्यांनी आपल्या पैशांची परत मागणी केली. मात्र, आरोपी सौरभने पैसे परत करण्यास नकार दिला आणि “जे करायचे ते करून घे” अशी धमकी डॉक्टर तोंडे यांना दिली. याप्रकरणी ९ डिसेंबर२०२५ रोजी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम करत होते. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान,आरोपी बेंगळुरूहून कराडमार्गे पुण्याला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी पहाटे कराड येथे ट्रॅव्हल्सची झडती घेऊन पोलिसांनी सौरभला ताब्यात घेतले. त्याला आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सौरभ कुलकर्णी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील एकूण १५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यात प्रामुख्याने खालील ठिकाणांचा समावेश आहे: नाशिक (वाडा), सोलापूर (टेंभुर्णी, विजापूर नाका), जालना (चंदनझिरा, घनसावंगी), नागपूर (धंतोली, हुडकेश्वर), पुणे (खडकी), मुंबई (दहिसर). तसेच अमृतसर (पंजाब), देसा सिटी बनास फाटा (गुजरात) आणि धारूर (बीड) येथेही गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कांवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर, आमिर इनामदार आणि अनिल मंदे यांच्या पथकाने केली. प्रस्तुत या मोठ्या कारवाईमुळे केज पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.