कोल्हापूरच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. ऋतुजा मुंडे व डॉ. वेदिका मानेची दुहेरी सुवर्णभरारी;सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रथम पारितोषिके पटकावली.
प्रतिनिधी/ कोल्हापूर:पन्हाळा जि. कोल्हापूर येथील डॉ.दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिने करवीर नगरी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या अमोघ वक्तृत्वाने निर्विवाद वर्चस्व गाजवत दुहेरी यश संपादन केले आहे.या स्पर्धेत तिने सांघिक नेतृत्व करत तिने व तिची सहकारी डॉ. वेदिका लहू माने हिने प्रथम क्रमांकाचा फिरता चषक आणि डॉ. ऋतुजा मुंडे हिने वैयक्तिक वक्तृत्वाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, डॉ. ऋतुजा मुंडे व डॉ. वेदिका माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करवीर नगरी,कोल्हापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मधील मराठी विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रा. डॉ. एन. डी. पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ काल दिनांक१९/१/२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत डॉ.ऋतुजा मुंडे हिने अत्यंत प्रभावीपणे आपले विचार मांडले. तिच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आणि संवादकौशल्यामुळे तिने वरिष्ठ गटात वैयक्तिक प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर, तिच्या व तिची सहकारी डॉक्टर वेदिका माने हिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला स्पर्धेचे सर्वोच्च ‘सांघिक प्रथम फिरती ढाल’ (विजेता चषक) देऊन गौरवण्यात आले.
या यशाबद्दल डॉ. ऋतुजा मुंडे व डॉ. वेदिका माने हिचे संस्थेचे पदाधिकारी डॉ. स्वाती पाटील मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन ताटपुजे , मार्गदर्शक प्रा. डॉ केदार तोडकर आणि विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन होत आहे. एका वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनीने सामाजिक आणि वैचारिक विषयावर आधारित स्पर्धेत राजस्तरावर यश मिळवल्याने तिचे विशेष कौतुक केले जात आहे. ”वक्तृत्व कलेच्या माध्यमातून सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा हा प्रयत्न असून, हे यश माझ्या मार्गदर्शकांचे आणि कष्टाचे फळ असल्याचे मत डॉ. ऋतुजा मुंडे हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.