बीड जिल्ह्यात ज्योतीताई मेटे मांडणार वेगळी चूल. ————————- जिल्ह्यातील पाच विधानसभा लढवणार?
—————————————- बीड: लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी श्रीमती ज्योतीताई मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली जाणार असून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. श्रीमती ज्योतीताई मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडे स्वतंत्र प्रस्ताव ठेवून लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले.एकीकडे महाविकास आघाडी कडून त्यांचे पारडे जड मानले जात होते. खा. शरदचंद्र पवार यांची भेट सुद्धा श्रीमती मेटे यांनी घेतली होती. पवारांचा प्रस्ताव हा मेटेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावे असा होता तर मेटेनी मी शिवसंग्राम तर्फेच लढेन असे सांगितले होते. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मेटे यांनी भेट घेतल्याने पवारांनी मेटे यांच्याकडे दुर्लक्ष करून खा.बजरंग सोनवणे यांच्यावर ताकद खर्ची करण्याचा निर्णय घेतला व त्यांना यश सुद्धा आले.आता विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. बीड जिल्ह्यात गावागावात स्व.विनायकराव मेटे यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.स्वर्गीय मेटे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना नेतृत्वाची संधी दिलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांचा मोठा संघर्ष राहिलेला आहे. विशेष म्हणजे त्यांचा बळी सुद्धा याच कारणामुळे गेला आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती.या बैठकीला जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात मराठा आरक्षण प्रश्नावरून झाली त्याच प्रश्नावरून त्यांचा मृत्यू सुद्धा झाला. मराठा समाजात मेटे यांची वेगळी व्होट बँक आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय राज्यात महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फार चांगले दिवस दिसत नाहीत म्हणून स्वतंत्रपणे शिवसंग्रामच्या वतीने उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये परळी, केज, माजलगाव,बीड, गेवराई या ठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत.बीडमधून त्या स्वतः उमेदवार असणार आहेत. तर इतर ठिकाणी चाचपणी सुरू आहे.मराठा समाजात मेटे यांच्या विषयी मोठी सहानुभूती आहे. तसेच ज्योतीताई मेटे यांनी स्व. विनायकराव मेटे यांची धुरा समर्थपणे पुढे नेण्याचा संकल्प केला आहे.त्याचा श्रीगणेशा सुद्धा झाला असून ठीक ठिकाणी कार्यकर्ता मिळावे घेत आहेत. केज मधून उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक इच्छुक उमेदवार मेटे यांच्या संपर्कात असून मराठा आरक्षण, स्व.मेटे यांची सहानुभूती आणि जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे ज्योतीताई मेटे या महायुती व महाविकास आघाडीला चांगली लढत देतील. अशी चर्चा सुरू आहे. पडद्यामागून अनेक डाव टाकले जाणार आहेत.राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे.त्यामुळे जिल्ह्यात मेटे यांचे उमेदवार धमाका करतील अशी शक्यता आहे. अनेक अदृश्य हात मेटे यांच्या पाठीशी असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती सर्वसामान्य जनतेसमोर येणारच आहे.तो पर्यंत मतदारांना वाट पाहवी लागणार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.