पुणे येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाला १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!
पुणे:शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास चालू असलेल्या राज्यव्यापी एसआयटी चे हेडक्वार्टर असलेल्या व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका शिक्षण उपनिरीक्षकाला एक लाख रुपयांची लाचखोरी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली असून, यापूर्वी नागपूरमध्येही अशाच प्रकारे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला अधिकारी केवळ एक मोहरा असून यामागे मोठे अधिकारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, सोलापूर येथील एका महिला शिक्षिकेला ‘शालार्थ आयडी’ देण्यासाठी एक लाखाची लाच मागण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलेले असतानाही भ्रष्टाचाराचे हे प्रकरण उघडकीस आले आहे.शालार्थ आयडी घोटाळा अनेक वर्षांपासून सुरू आहे… अनेकांना अटक होते, तपास होतो, अहवाल येतात. तरी घोटाळे थांबत का नाहीत? असा संतप्त सवाल सर्व स्तरातून उपस्थित केला आहे. शालार्थ आयडीसाठी एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब मिरगणे (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आरोपीच्या केबिनमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका आहे. त्यांना शालार्थ आयडी नसल्याने त्या २०१६ पासून विनावेतन काम करत होत्या. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव दि. १६ जून २०२५ रोजी सोलापूर विभाग शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे दाखल केला होता. हा प्रस्ताव ‘ई-ऑफिस’मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी आरोपीने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. या अनुषंगाने दि. १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यात आरोपी रावसाहेब मिरगणे यांनी एक लाख रुपये रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती उघड झाली आहे.
रावसाहेब मिरगणे यांनी बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आणि पुणे जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची उस्मानाबाद जि. प. च्या माध्यमिक उप शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. रावसाहेब मिरगणे यांनी या अगोदर बार्शी नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळसह कुर्दुवाडी, करमाळा, पंढरपूर, सासवड, अहमदनगर महानगरपालिका शिक्षण मंडळ येथे प्रशासन अधिकारी तसेच शासकीय अध्यापक विद्यालय पुणे येथे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. त्याने पुणे येथे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. पुणे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे कार्यालयातील शास्त्र सल्लागार या तीन पूर्णवेळ पदाचे काम पाहिलेले आहे . रावसाहेब मिरगणे यांचे कडे कर्तव्यदक्ष व उपक्रमशील, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून पाहिले जात असतानाच मिरगणे हा लाचखोरीच्या जाळ्यात सापडल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे., नगरपालिका शिक्षण मंडळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असतानाच काल मात्र रावसाहेब मिरगणे ला एक लाखाच्या लाचखोरीच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.