बीड/मुंबई: एका बाजूला राज्य सरकार पारदर्शकतेचे दावे करत व शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचे आश्वासन देत असतानाच, बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराने केवळ महाराष्ट्रालाच हादरवले नाही, तर या प्रकरणातील चौकशी अहवालच ‘मॅनेज’ करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेले ‘सेटिंग’ आता एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे चव्हाट्यावर आले आहे. ही क्लिप समोर आल्यानंतर शिक्षण वर्तुळात आणि मंत्रालयीन स्तरावर प्रचंड खळबळ उडाली असून, याची धग थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि नेमण्यात आलेल्या राज्यस्तरीयस “एसआयटी” ला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून बोगस शिक्षक भरती, थकीत वेतन, शाळा अनुदानातील गैरव्यवहार आणि बोगस विस्तार अधिकारी नियुक्ती आणि न्यायालयीन अवमान प्रकरणे अशा अनेक प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन सरकारने राज्यस्तरीय ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) ची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, या ‘एसआयटी’चा अहवाल सरकार दरबारी सादर होण्यापूर्वीच, तो आपल्या सोयीनुसार बदलण्यासाठी किंवा दाबण्यासाठी बीडमधील दोन बड्या शिक्षण अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या फोन संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
‘एसआयटी’ अहवाल बदलण्यासाठी ‘डील’चे बोलणे! व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बीड जिल्हा परिषदेचे केजचे तत्कालीन वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर आणि बीडचे माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या आवाजातील खळबळ जनक आणि शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगणारा संवाद ऐकू येत आहे. यात, बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ‘एसआयटी’ चौकशीचा अहवाल आपल्या बाजूने कसा फिरवायचा, यासाठी काय ‘व्यवस्था’ करायची, यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. संवादात, नागनाथ शिंदे हे लक्ष्मण बेडस्कर यांना ‘एसआयटी’च्या प्रमुखांना ‘मॅनेज’ करण्याची आणि अहवाल अनुकूल करून घेण्याची ‘गुरुकिल्ली’ सांगताना ऐकू येत आहेत. अहवाल सकारात्मक येण्यासाठी ‘हात रिकामा सोडावा लागेल’ असे स्पष्ट निर्देश देताना, संवादातून ऐकण्यास मिळत आहे. नागनाथ शिंदे यांनी स्वतःच्या भ्रष्टाचाराचा अहवाल पॉझिटिव्ह करून घेण्यासाठी यापूर्वीही एका महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या पीएकडे अहवालासाठी स्वतःच्या खिशातून ५ लाख आणि नंतर २ लाख रुपये दिल्याचे धक्कादायक विधान केले आहे. “एकदा का निगेटिव्ह अहवाल आयुक्तांच्या तडाक्यात गेला, की काहीच करता येणार नाही,” असे म्हणत अहवाल बदलून घेण्याची तातडीची गरज त्यांनी सदरच्या व्हायरल ऑडिओ क्लिप मधून अधोरेखित केली आहे. बोगस शिक्षक आणि शालार्थ आयडीचा महाघोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीत २०१२ पासून झालेल्या शिक्षक नेमणुका आणि बोगस शिक्षकांना मिळालेले शालार्थ आयडी हे मुख्य तपासण्याचे मुद्दे आहेत. या संवादात, पूर्वीच्या आपल्याशी संबंधित असलेल्या चौकशीत ९०० फाईल्स तपासल्या गेल्या आणि सदरच्या फाइल्स त्रुटीत आणि नियमात नसताना सुद्धा त्या ‘निरंक’ निघाल्याचा दावा नागनाथ शिंदे यांनी केला असून,आताच्या ‘डील’मुळे पूर्वीच्या चौकशांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार आणि भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना देखील सदरील वायरल क्लिप मधून उभयतांनी लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या महाघोट्याळ्याचा पर्दाफाश करणारे आरटीआय कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्यावर कारवाई करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्नही याच अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप समोर येत आहे. यामुळे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आणि तो उघड करणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. बीडचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि केज चे निलंबित वादग्रस्त गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर या दोघांच्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल झाल्यामुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून,कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयातील शिक्षण विभागासह सर्वच संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘एसआयटी’च्या अहवालात ‘फेरफार’ करण्याचा प्रयत्न ही एक गंभीर बाब असून, यातून तपास यंत्रणांवर किती दबाव असतो, हे स्पष्ट झाले आहे. आता राज्य सरकार या व्हायरल क्लिपची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर आणि यात सहभागी असलेल्या ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रस्तुत ऑडिओ क्लिप मधील वास्तव व परिस्थिती समोर आली तर एस आय टी सारख्या यंत्रणावरील विश्वास संपुष्टात येण्याची भयानकता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी केवळ ‘एसआयटी’ अहवालच नव्हे, तर ‘एसआयटी’च्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शिक्षण विभागाला लागलेली ही कीड वेळीच काढली नाही, तर भविष्यात शैक्षणिक क्षेत्रावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. पहा व्हायरल क्लिपचा अंश . “अहवाल बदलण्यासाठी हात रिकामा सोडावा लागेल”, “५ लाख देऊन काम केले”. या क्लिपमध्ये दोघांमधील संवादात SIT (Special Investigation Team) अहवाल बदलण्यासाठी “योजना” तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या कथित संभाषणामुळे शिक्षण खात्यातील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संभाषणातील आशयातून नवा वाद व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काही ठिकाणी “हा दम समजायचा, तू ये खेटायला, घुगे स्वतः पडतो मॅटरमध्ये” अशा शब्दांचा उल्लेख आहे. हे शब्द दबाव व धमकीच्या स्वरूपातील भाष्य असल्याचे संबंधितांनी म्हटले आहे. या संवादामुळे SIT च्या चौकशी अहवालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला का, या प्रश्नावर राज्यभर चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संभाषणातील आवाज संबंधित अधिकाऱ्यांचेच असल्यास, हे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे उदाहरण ठरेल, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनी फॉरेन्सिक तपासणी करून सत्य समोर आणण्याची व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. सदर घटनेविषयी नागनाथ शिंदे आणि लक्ष्मण बेडसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल; कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.” राज्यस्तरीय लक्षवेधी प्रकरण. ही घटना बीडपुरती मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्यात आणि राज्यभर चर्चेत आली आहे. शिक्षण विभागातील चौकशी आणि तपास यंत्रणांची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणावर राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. — पाठलाग न्यूज चे मत या घटनेने शिक्षण प्रशासनातील जबाबदारी, प्रामाणिकता आणि सार्वजनिक विश्वास यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. SIT अहवाल बदलण्याचा प्रयत्न केवळ कायदेशीरदृष्ट्याच नव्हे तर नैतिक दृष्ट्याही गंभीर गुन्हा ठरतो. शासनाने निष्पक्ष चौकशी करून या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.