कृष्णा अर्बन बँक डिजिटल सुविधा लोकार्पण व ‘साप्ताहिक पृथ्वी प्रतिष्ठान’च्या प्रथम अंकाचे प्रकाशन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते थाटात संपन्न.
केज / प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बँकिंग सेवा अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल करण्याच्या दिशेने कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. केज ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. शाखा बरड (ता. केज) येथे बँकेच्या ऑनलाईन मोबाईल बँकिंग, फोन पे आणि गुगल पे या डिजिटल सुविधांचा लोकार्पण सोहळा, तसेच केज येथील पृथ्वी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या ‘साप्ताहिक पृथ्वी प्रतिष्ठान’ या नियतकालिकाच्या प्रथम अंकाचा प्रकाशन सोहळा संयुक्तपणे उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या डिजिटल उपक्रमाचे आणि पृथ्वी प्रतिष्ठानच्या सामाजिक-वैचारिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “ग्राहकांना काळानुरूप अत्याधुनिक आणि गतिमान सेवा देणे ही काळाची गरज आहे. मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार अधिक सोयीस्कर होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोबतच, ‘साप्ताहिक पृथ्वी प्रतिष्ठान’ हे वृत्तपत्र सामाजिक जागृती आणि प्रादेशिक विकासासाठी प्रभावी माध्यम ठरेल, अशी शुभेच्छा त्यांनी दिली. डिजिटल बँकिंग सुविधांमुळे कृष्णा अर्बन बँकेच्या ग्राहकांना आता घरात बसून मोबाईलच्या माध्यमातून सुरक्षित, जलद आणि सहज व्यवहार करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून बँकेने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद मानला जात आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक श्री. विक्रमबप्पा मुंडे, चेअरमन श्री. विजयकांतभैय्या मुंडे, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या संयुक्त सोहळ्याला मा. खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा, माजी आमदार केशवदादा आंधळे, भाजप युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, बँकेचे अधिकारी-कर्मचारी, पृथ्वी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.