तुकाराम मुंढेंची किमान ३ वर्षे बदली करू नका! FDA मधील ‘घाण’ स्वच्छ करण्यासाठी तुकाराम मुंढे यांचीच गरज.राज्यातून मुख्यमंत्र्यांकडे जोरदार मागणी.
विशेष प्रतिनिधी / मुंबई: राज्यातील धडाकेबाज, प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदावरून पुन्हा एकदा बदली होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.मात्र,या चर्चेमुळे राज्यातील सामान्य नागरिक आणि ग्राहक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “एफडीए मधील संपूर्ण घाण स्वच्छ होईपर्यंत माननीय तुकाराम मुंढे यांची किमान तीन वर्षे या पदावरून बदली होऊ नये,” अशी आक्रमक मागणी आता तमाम जनतेमधून पुढे येऊ लागली आहे. यासंदर्भात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदने पाठवली जात आहेत. तुकाराम मुंढे यांनी ‘एफडीए’चा पदभार स्वीकारल्यापासून नेहमीप्रमाणे आपल्या कडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळमाफियांवर त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. दुध, अन्नपदार्थ आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमांमुळे भ्रष्ट साखळीचे आणि माफियांचे धाबे दणाणले आहेत. अनेक वर्षांपासून ‘एफडीए’ विभागात ठाण मांडून बसलेल्या काही भ्रष्ट घटकांना आणि दलालांना मुंढे यांच्या शिस्तीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच काही हितसंबंधी गटांकडून त्यांच्या बदलीसाठी राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. ’शिक्षण आयुक्त’ पदाचीही मागणी, पण सध्या स्थैर्याची गरज एकीकडे राज्यातील पालकांकडून शिक्षण क्षेत्रातील मनमानी आणि फी वसुलीला चाप लावण्यासाठी मुंढे यांना ‘शिक्षण आयुक्त’ करण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे मात्र जनतेचा सूर बदलला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, मुंढे यांना शिक्षण विभागात पाठवणे नक्कीच फायद्याचे ठरेल, परंतु सध्या ते ‘एफडीए’मध्ये करत असलेले काम थेट सामान्य माणसाच्या आरोग्याशी संबंधित आहे. ”मुंढे जिथे जातात, तिथली व्यवस्था स्वच्छ करतात; पण त्यांना काम करण्यासाठी पुरेसा वेळच दिला जात नाही,” अशी खंत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच, जोपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनातील संपूर्ण व्यवस्था भ्रष्टाचारातून आणि अकार्यक्षमतेतून मुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांना याच पदावर ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. बदल्यांच्या ‘म्युझिकल चेअर’वर जनतेचा आक्षेप तुकाराम मुंढे यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांच्या झालेल्या वारंवार बदल्या हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. एका विभागात स्थिरावण्यापूर्वीच आणि त्यांचे धोरण पूर्णपणे लागू होण्यापूर्वीच त्यांची बदली केली जाते. प्रशासकीय नियमानुसार कोणत्याही सनदी अधिकाऱ्याला एका पदावर किमान ३ वर्षांचा कार्यकाळ मिळणे अपेक्षित असते. नागरिकांची थेट भूमिका:”आम्हाला खात्यांची अदलाबदली नको, तर खात्यांची स्वच्छता हवी आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीए मधील औषध आणि अन्न भेसळीची संपूर्ण घाण साफ करेपर्यंत त्यांची बदली थांबवली पाहिजे. प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आणि स्थैर्य मिळालेच पाहिजे.” आता या जनभावनेची दखल घेऊन राज्य सरकार तुकाराम मुंढे यांना ‘एफडीए’मध्येच ठेवून काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते, की पुन्हा एकदा राजकीय दबावापोटी त्यांची बदली केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.