बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना निर्वाणीचा इशारा; समायोजन माहिती न दिल्यास मुख्याध्यापकांचे पगार रोखणार.
बीड | प्रतिनिधी: जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांनी अद्याप शिक्षक समायोजनाची (Surplus Teachers Adjustment) माहिती सादर केलेली नाही, अशा शाळांविरुद्ध माध्यमिक शिक्षण विभागाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन थांबवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियराणी पाटील यांनी दिले आहेत. शिक्षण विभागामार्फत सध्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी शाळांकडून ‘अ’ आणि ‘ब’ प्रपत्रात माहिती मागवण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप ही माहिती माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात जमा केलेली नाही. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, समायोजन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या शाळांवर थेट आर्थिक कारवाईचा बडगा उगारला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियराणी पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या शाळांनी अद्याप माहिती दिलेली नाही, त्यांनी दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजेपर्यंत शिक्षण विभाग (माध्यमिक) येथे समक्ष उपस्थित राहून माहिती सादर करावी. जर उद्या सकाळपर्यंत माहिती सादर केली नाही, तर संबंधित मुख्याध्यापकांचे वेतन तत्काळ थांबवण्यात येईल. माहिती न देणाऱ्या संपूर्ण शाळेचे माहे एप्रिलचे वेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त शिक्षकांची यादी आज होणार ‘फ्लॅश’ संस्थांतर्गत समायोजन होत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांची माहिती समायोजन आदेशासह जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी हरकतींसाठी आजच प्रसिद्ध (Flash) करण्यात येणार असल्याचेही शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या कठोर निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रलंबित माहिती जमा करण्यासाठी मुख्याध्यापकांची आता धावपळ सुरू झाली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.