रायपूरः 120 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार आपल्या शोधपत्रकारितेच्या माध्यमातून उघड करणाऱ्या पत्रकाराची सेप्टिक टॅंक मध्ये बुडवून निर्घन हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकारच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. चंद्राकारचा चुलत भाऊच त्यांचा मारेकरी निघाला. २८ वर्षीय मुकेश चंद्राकारच्या हत्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात मुकेश यांचा भाऊ रितेश चंद्राकारचाही समावेश आहे. मुकेश त्याच्या शोध पत्रकारितेसाठी ओळखला जायचा. सरकारी योजना, प्रकल्पांमधील अनेक घोटाळे, अपहार त्यानं आपल्या वृत्तांकनामधून समोर आणले होते.मुकेश चंद्राकारनं काही दिवसांपूर्वीच बस्तर परिसरातील गंगापूर ते हिरोलीला जाणाऱ्या १२० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामातील कथित भ्रष्टाचार बाहेर काढला. या रस्त्याच्या कामासाठी आधी ५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. त्यानंतर ही रक्कम १२० कोटी रुपये करण्यात आली. रस्त्याचं कंत्राट सुरेश चंद्राकार यांना मिळालं होतं. मुकेश यांच्या बातमीनंतर राज्य सरकारनं चौकशी सुरु केली. त्यामुळे कंत्राटदार लॉबीत खळबळ उडाली.सुरेश चंद्राकारचा भाऊ रितेशनं १ जानेवारीच्या रात्री मुकेशची कंत्राटदारासोबत बैठक निश्चित केली होती. या भेटीनंतर मुकेश यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ झाला. मुकेश बेपत्ता झाल्याचं त्याचा मोठा भाऊ युकेश चंद्राकारनं सांगितलं. दोन दिवसांनंतर मुकेशचा मृतदेह चट्टनपारा येथील सुकेश यांच्या मालकीच्या एका मालमत्तेमधील सेप्टिक टँकमध्ये सापडला. तिकडेच तो शेवटचा दिसला होता. पोलिसांनी रितेश आणि कुटुंबातील एक अन्य सदस्य दिनेश चंद्राकारसह ३ संशयितांना अटक केली आहे. भ्रष्टाचारामुळे चर्चेत आलेला कंत्राटदार सुरेश अद्याप फरार आहे.पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश आणि रितेश यांच्यात चांगली मैत्री आहे. जिथे पत्रकार मुकेशचा मृतदेह सापडला, तिकडे दोघे अनेकदा भेटायचे. रस्ते बांधकामात घोटाळा मुकेशनं उजेडात आणल्यानं त्यांच्या नात्यात कटुता आली. या प्रकरणात मुकेशच्या कुटुंबाला कोणतीही थेट धमकी देण्यात आलेली नव्हती. मुकेश २०१२ पासून पत्रकारिता करत होता. बस्तर जंक्शन नावानं त्यानं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरु केलं. त्याचे १.५९ लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स होते. बीजापूरच्या बासागुडा गावचा रहिवासी असलेला मुकेश स्थानिक मुद्द्यांवर निडर पत्रकारिता करायचा. त्याची निर्भीड पत्रकारिता, वृत्तांकन चर्चेचा विषय ठरलं. या प्रकरणी सखोल तपास करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.