लाच घेताना केज पंचायत समिती अंतर्गत केकत सारणीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात.
केज: मंजूर घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एनओसी देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेचे डिमांड करून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज पंचायत समिती अंतर्गत केकत सारणी येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले असून, केज पंचायत समितीमधील पद सिद्ध कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या लाचखोरीचा हा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केज पंचायत समिती अंतर्गत केकत सारणी ग्रामपंचायतीला कार्यरत असणारे ग्रामसेवक सुरेश ठोंबरे रा. सारणी (सांगवी ) यांनी घरकुलाचा लाभधारकाकडून घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र लागते म्हणून या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या कर्मचाऱ्याने लाच देण्यास नकार देत याबाबत बीडच्या एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, शुक्रवारी (दिनांक २० सप्टेंबर) दुपारी संबंधित ग्रामसेवक सुरेश ठोंबरे यांनी लाचेची रक्कम म्हणून दोन हजाराचा पहिला हप्ता स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने त्याला पंचायत समिती परिसरात रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पंचायत समितीत खळबळ उडाली असून, या प्रकरणातील सखोल तपासानंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने केज पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांना आणि विविध योजनांच्या लाभधारकांना छोटी-मोठी कामे करून घेण्यासाठीही लाच द्यावी लागते, असे चित्र या घटनेने समोर आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंदराव कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सदरची कारवाई छत्रपती संभाजी नगरच्या लाच लुप्त प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, शशिकांत शिंगारे,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, बीडचे पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, राहुलकुमार भोळ, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी, गणेश मेत्रे सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.