जाहिराती देत नसलेल्या नेत्यांच्या बातम्या छापू नयेत-संपादक संघाचा निर्णय.
बीड:- वृत्तपत्रांना जाहिराती न देणार्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बातम्या छापण्यात येवू नयेत असे बीडमधील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांनी आपसात विचार विनिमय करून निर्णय घेतला आहे. सर्व संपादकांनी सदर निर्णयाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन संपादक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सर्व मराठी वृत्तपत्रे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मोठमोठ्या बातम्या छापल्या जातात. अनेक नेत्यांना प्रसिद्धी देवून वृत्तपत्रांनी मोठे केले आहे. त्यांना आमदार, खासदार, मंत्री करण्यात वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. अगदी ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगर पालिका आदी कार्यकर्त्यांच्या पाठीशी वृत्तपत्रे उभी राहिली आहेत. परंतु हीच नेते मंडळी व कार्यकर्ते वृत्तपत्रांना जाहिराती देत नाहीत, जाहिराती देण्यासाठी आपला हात आखडता घेतात. मात्र निवडणुकीमध्ये कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करतात. अगदी गल्ली बोळात निवडणुक काळात हीच मंडळी लाखो रूपये रेवड्या-फुटाणे वाटावेत तसे वाटतात. परंतु त्यांना मोठे करणार्या वृत्तपत्रांकडे कानाडोळा करतात. वृत्तपत्राचा वर्धापन दिन असेल, दीपावली अंक असेल अथवा नेत्यांचे वाढदिवस असतील जाहिराती देण्याचे टाळतात. काही नेते जाहिराती देतात बिले देत नाहीत. तर दुसरीकडे लावणी महोत्सव साजरे करून बायका नाचवायच्या व कोट्यवधीचा खर्च करायचा असेही काही नेत्यांचे धंदे आहेत. तर काही नेते तर स्वत:ला राष्ट्रीय नेते म्हणवून घेतात व नुसते गोड बोलतात. गोड बोलण्याने वृत्तपत्रे चालत नाहीत किंवा तुमच्या मोठेपणाच्या कोरड्या आश्वासनावर सुद्धा वृत्तपत्रे चालत नाहीत. वृत्तपत्राच्या खर्चाचा विचार केल्यास आज अनेक पटींनी खर्च वाढलेला आहे. तीन-पाच रूपयात काय मिळते? वृत्तपत्रे सामान्य माणसांचा आजही मोठा आधार आणि विश्वास आहे. सामान्य माणूस मग तो ग्रामीण भागातील असो की शहरी माणुस असो तो आजही लाखोंच्या संख्येने वृत्तपत्रांचे वाचक आहेत. आम्ही छापलेल्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोचतात. अजूनही सामान्य जनतेचा छापील वृत्तपत्रावर व त्यातील बातम्यावरच विश्वास आहे आणि म्हणुन ही सर्व मराठी वृत्तपत्रे ठामपणे उभी राहणे आवश्यक आहे. म्हणून नेते व कार्यकर्त्यांच्या जाहिरातरूपाने सहकार्याची अपेक्षा आहे. परंतु जे नेते व कार्यकर्ते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. स्थानिक वृत्तपत्रांना जाहिराती देत नसतील त्यांच्या बातम्यावर बहिष्कार टाकण्याचा व त्यांच्या बातम्या छापण्यास टाळण्याच्या बीडच्या संपादकांनी आपापसात संवाद करून निर्णय घेतला आहे.लवकरच सर्व संपादकांची बैठक बोलावली जाणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.