प्रशांत वाडीलेच्या मोबाईलने उडवली बीडच्या शिक्षण विभागाची झोप! शालार्थ आयडी घोटाळ्याचा सर्वात मोठा स्फोट!
धुळ्याचा एजंट, बीडचे दलाल आणि कोट्यवधींचा शालार्थ आयडी घोटाळा!
बीड /विशेष प्रतिनिधी: उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या कथित ‘शालार्थ आयडी घोटाळ्याची’ पाळेमुळे आता बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. धुळे येथून नाशिक आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विशेष तपास पथकाने (SIT) अटक केलेला मुख्य एजंट आणि संस्थाचालक प्रशांत तुळशीराम वाडीले याच्या मोबाईल जप्तीनंतर मराठवाड्यातील, विशेषतः बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे धागेदोरे समोर आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाडीलेच्या व्हॉट्सॲप चॅट्स आणि डिजिटल डेटाच्या प्राथमिक तपासात बीड जिल्ह्यातील काही संशयित शिक्षक, शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागातील बड्या दलालांची नावे ‘SIT’ च्या रडारवर आली आहेत. कसा उघड झाला बीडचा दुवा? नाशिक एसआयटीने प्रशांत वाडीलेच्या धुळे येथील निवासस्थानावर छापा टाकून त्याचा मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर जप्त केला होता. या जप्त केलेल्या मोबाईल डेटाच्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषणामध्ये पोलिसांना केवळ उत्तर महाराष्ट्रच नव्हे, तर बीड, अंबाजोगाईसह मराठवाड्यातील अनेक शाळांचे बनावट लेटरहेड्स, शासकीय मान्यतांचे कोरे प्रस्ताव आणि संशयित शिक्षकांची यादी आढळून आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळ्यातील या मुख्य एजंटने बीड जिल्ह्यातील काही स्थानिक दलालांच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी संधान साधले होते. मागील तारखेच्या बनावट वैयक्तिक मान्यता (Personal Approvals) आणि संचमान्यतेमध्ये फेरफार करून शालार्थ आयडी मिळवून देण्याचे मोठे रॅकेट बीड जिल्ह्यात कार्यरत असल्याची दाट शक्यता यावरून वर्तवली जात आहे. एका आयडीसाठी २० ते २५ लाखांची उकळपट्टी प्रशांत वाडीलेची गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) अत्यंत हायटेक आणि संघटित होती. तो शिक्षण विभागाची अधिकृत ‘शालार्थ प्रणाली’ हॅक करून किंवा वेतन अधीक्षकांच्या लॉगिनचे पासवर्ड बेकायदेशीरपणे रिसेट करून बनावट आयडी तयार करायचा. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना मागील तारखेचे बनावट आदेश तयार केले जायचे. एका शालार्थ आयडीसाठी शिक्षकांकडून २० ते २५ लाख रुपये उकळले जात होते. शिक्षकांच्या वैद्यकीय देयकांवर (Medical Bills) मंजुरी मिळवून देण्यासाठी थेट ५०% कमिशन घेतले जात होते. बीडच्या शिक्षण विभागातील ‘त्या’ पांढरपेशांची धडधड वाढली! वाडीलेच्या मोबाईलमध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्या शाळांचे प्रस्ताव होते? आणि बीड शिक्षण विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या नावांचा त्यात उल्लेख आहे? याचा सखोल तपास आता नाशिक एसआयटी करत आहे. तपासाची व्याप्ती पाहता, या प्रकरणात प्रशांत वाडीलेवर मोक्का (MCOCA – संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपासाची दिशा: मंत्रालयापासून ते स्थानिक जिल्हा स्तरापर्यंत पसरलेल्या या रॅकेटमध्ये आत्तापर्यंत १२,०० हून अधिक संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. वाडीलेच्या बीड कनेक्शनच्या अधिकृत चौकशीसाठी नाशिक एसआयटी लवकरच बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून (प्राथमिक व माध्यमिक) काही जुने रेकॉर्ड्स आणि संशयित फाईल्स ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बीडमधील अनेक बड्या संस्थाचालकांचे आणि शिक्षण विभागातील दलालांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याचा पुढील ‘पाठलाग’ नाशिक एसआयटी कशी करते आणि बीड जिल्ह्यातील कोणती मोठी नावे यात समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.