घुले हत्या प्रकरण: “घटनेदिवशी मी अन् माझी थार गाडीही घरीच” खासदार पुत्र सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोर जाण्याची दर्शवली तयारी.
केज: टाकळी येथील विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेचा मी निषेध करत असून, या प्रकरणात माझ्यावर काही आरोप करण्यात येत आहेत. परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर आणि दुपारनंतर मी घरी होतो. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मी घरीच असून दिवसभरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी नेले आहेत. माझ्यावर राजकिय द्वेषातून आरोप होत आहेत, अशी प्रतिक्रिया सौरभ सोनवणे यांनी माध्यमांना दिली आहे.
विलास घुले हत्या प्रकरणात नाव घेतल्यानंतर सौरभ सोनवणे यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. सौरभ सोनवणे म्हणाले, ‘विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र घटनेच्या दिवशी मी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर होतो आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरीच होतो. दरम्यान, या गुन्ह्यात माझी थार गाडी दिसल्याचा आरोप केला आहे,परंतु माझी थार घरीच होती. त्याचेही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून माझी गाडीही घराजवळ असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. सदरील आरोप हे राजकीय हेतूने आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचा दावा केला.’मी खासदारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतो. जिल्हाभर फिरत आहे. लोक आमच्यावर प्रेम करतात, हे काहींना खटकत असल्यामुळेच माझे नाव या प्रकरणात गोवले जात आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो,’ असे ते म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. ‘सत्य समोर आले पाहिजे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असून त्यातूनही वस्तुस्थिती स्पष्ट होईल. पोलीस प्रशासन सत्य जनतेसमोर आणेल, असा मला विश्वास आहे,’ असे सौरभ सोनवणे यांनी सांगितले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.