माणुसकीला काळिमा! बीडमध्ये २१ वर्षीय तरुणीची एका महिन्यात तीनदा विक्री;चौथ्या लग्नाच्या भयाने विष प्राशन केले.
बीड/ क्राइम प्रतिनिधी : जिल्ह्याला हादरवून सोडणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय विवाहित तरुणीला पैशांच्या हवसेपोटी केवळ एका महिन्यात तब्बल तीन वेळा विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष छळाला कंटाळून पीडितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकाराबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तरुणीचे लग्न दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका गावात झाले होते. मात्र, पतीच्या त्रासामुळे ती माहेरी राहत होती. याच काळात तिची ओळख पुण्यातील महानंदा नावाच्या महिलेशी झाली. “तुझे दुसरे चांगले लग्न लावून देते,” असे आमिष दाखवून महानंदाने तिला पुण्यात नेले. मात्र, सदर अन्यायग्रस्त महिलेला केलेली मदत नसून एका मोठ्या मानवी तस्करीच्या जाळ्याचा हिस्सा असल्याचे स्पष्ट झाले आहे . पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपींनी तिला एखाद्या वस्तूंप्रमाणे विकायला सुरुवात केली: पहिली विक्री: पुण्यातील अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेऊन तिचे पहिले बळजबरीने लग्न लावून दिले. दुसरी विक्री: पहिल्या लग्नाला १० दिवसही पूर्ण झाले नसताना, तिला तिथून काढून दुसऱ्या एका व्यक्तीला ४.५ लाख रुपयांत विकले गेले. तिसरी विक्री: ४ मार्च २०२६ रोजी तुळजापूरच्या एका महिलेच्या मदतीने बीडमधील आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावून देण्यात आले. या व्यवहारातूनही आरोपींनी ४.५ लाख रुपये उकळले. चौथ्या लग्नाचा दबाव आणि आत्महत्येचा प्रयत्न इतके अत्याचार होऊनही आरोपींची पैशांची हाव संपली नव्हती. ६ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला पुन्हा फोन केला आणि “चौथ्या लग्नासाठी तयार राहा, नाहीतर जीवे मारू” अशी धमकी दिली. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून, तसेच भविष्यातील अंधकारमय आयुष्याच्या भीतीने पीडितेने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिलांच्या खरेदी-विक्रीचे हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महानंदा, अमर कालभोर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.”माणुसकीला काळिमा फासणारी ही बातमी बीडमधून समोर आली आहे. एका २१ वर्षांच्या विवाहित तरुणीला पैशांच्या लालसेपोटी महिनाभरात चक्क तीन वेळा विकलं गेलं. पुण्याच्या एका महिलेने मदतीचा हात देण्याऐवजी या तरुणीला मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढलं. एकामागोमाग तीन लग्ने लावून दिल्यानंतरही नराधमांची हाव संपली नाही. जेव्हा चौथ्या लग्नासाठी दबाव आला, तेव्हा या माऊलीने विष पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. प्रशासन यावर काय कारवाई करणार? पाहत राहा…” बीड जिल्ह्यात अशा प्रकारचे अनेक प्रकार चालू असलेची चर्चा दबक्या आवाजात चालू असून, जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने सतर्कता ठेवण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.