ताज्या घडामोडी
केज नगरपंचायत चा घरकुल घोटाळा आणि कानडी रोडच्या रुंदीकरण प्रश्नावर केज विकास संघर्ष समितीचे रस्ता रोको आंदोलन.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज नगरपंचायत चा घरकुल घोटाळा आणि कानडी रोडच्या रुंदीकरण प्रश्नावर केज विकास संघर्ष समितीचे रस्ता रोको आंदोलन.
केज/प्रतिनिधी: केज येथील नगरपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल निधी वितरणातला महाभ्रष्टाचार, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मालकीची जागा अन्य कामासाठी ताब्यात घेण्यासाठी केज नगर पंचायतने घेतलेला ठराव रद्द करणे व अनेक दिवस प्रलंबित असलेले कानडी रस्त्याचे दुरुस्ती काम तात्काळ करावे या मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीने येत्या मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जनतेच्या सहभागाने शहर अंतर्गत महामार्गांवर कानडी चौक येथे सकाळी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.केज नगर पंचायत अंतर्गत म्हाडा ने एकूण ३७४ लाभार्थ्यां साठी घरकुल मंजूरकरून त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ८० हजार एवढा निधी दि. १८ऑगस्ट २०२१ व दि.६फेब्रुवारी २०२३ च्या पत्रकान्वये मंजूर केलेला आहे. त्यापैकी फक्त १३३ लाभार्थ्यांना वरील रकमेतून लाभ मिळाला आहे. यातीलही अनेक लाभार्थ्यांना अद्याप कांहीच हप्ते मिळालेले नाहीत. उर्वरित २४१ गोरगरीब पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असताना ही कसलाही लाभमिळालेला नाही. हे प्रकरण लेखापाल महारुद्र वडकर यांनी तपशीलवार लेखापरीक्षण करून अहवालाच्या रूपाने दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी केज नगर पंचायतला कळवले होते. तरीही ते सार्वजनिक व्हायला चार महिने लागले. हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून यामध्ये गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काचे करोडो रुपये प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणमताने घशात घातले आहेत.या गंभीर प्रकरणात कागदोपत्री केवळ प्रशासकीय अधिकारी गुंतलेले दिसत असले तरी, एवढा मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी यामध्ये अधिकाऱ्यांना राजकीय लोकप्रतिनिधीचा सहभाग असून ते देखील यात वाटेकरी असावेत असा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्यस्तरीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केली आहे. समितीने केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मालकीच्या जागेवरील केवळ अतिक्रमणे कायम करण्यासाठी त्याला कायदेशीर स्वरूप देऊन ताबा मिळवण्यासाठी केज नगर पंचायतने घेतलेला बेकायदेशीर ठराव केज नगर पंचायत ने तात्काळ रद्द करून तसे सर्व संबंधित वरिष्ठ कार्यालयास कळवण्याची मागणीही केज विकास संघर्ष समितीने केली आहे.ही जागा शिक्षण विभागाची असून,या शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा पुन्हा गतवैभवात नेण्याची जोरदार तयारी सुरु केली असून, त्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याकरिता केज नगरपंचायत ने पूर्वीचा ठराव रद्द करून तसे पत्र समितीला देण्याची मागणी केली आहे. या शिवाय केज शहरातील कानडी रोड गेल्या कित्येक महिन्यापासून केज नगरपंचायतने पाईप लाईन साठी खोदकाम करून ठेवला आहे. पाईप लाईन टाकुन कांही आठवडे झाले तरी अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. यासाठी समितीने जनतेच्या सहभागाने आंदोलनेही केली आहेत मात्र समस्या सुटलेली नाही. वरील सर्व समस्या येत्या आठ दिवसात न सोडवल्यास समिती येत्या मंगळवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शहर अंतर्गत महामार्गांवर राष्ट्रसंत भगवान बाबा चौक, कानडी कॉर्नर येथे लोकांच्या सहभागाने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. वरील सर्व मागण्या व समस्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्या सोडवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे समितीचे मत बनले असून,या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामास संबंधित शासकीय यंत्रणा जबाबदार राहतील असा इशारा देखील समितीचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसलेसर यांनी दिला आहे. या आंदोलनात अन्याय झालेले सर्व घरकुल लाभार्थी, शिक्षणप्रेमी आणि कानडी रोड परिसरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ही समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी केले आहे. या निवेदनावर हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, इंजि.मोहनराव कराड व महेश जाजू यांच्या साइन आहेत.

—पृथ्वी प्रतिष्ठान केज.



