ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट अन्नाचा पुरवठा; समस्या न सुटल्यास विद्यार्थ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा.
विशेष वृत्त / अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहातील कारभार कमालीचा ढासळला असून, विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न व फळे पुरवली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील गैरसोयी व निकृष्ट अन्नाचा पुरावाच थेट समोर आणत विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसांत वसतिगृहातील सर्व समस्या सोडवून चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत, तर वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. निकृष्ट अन्न अन् आरोग्याशी खेळ ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना रोज निकृष्ट दर्जाचे अन्न सहन करावे लागत आहे. निकृष्ट प्रतीचे जेवण आणि खराब झालेली फळे विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यांसह उघड झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष वसतिगृहातील या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वेळेवर चांगल्या दर्जाचे जेवण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ८ दिवसांचा अल्टिमेटम ”वसतिगृहातील निकृष्ट जेवण व इतर समस्यांबाबत प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. पुढील ८ दिवसांत या सर्व समस्या कायमस्वरूपी न सुटल्यास वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आमरण उपोषण करतील,” असा थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. आता या इशाऱ्यानंतर तरी संबंधित विभाग व प्रशासन खडबडून जागे होऊन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.