केज येथे उरुसाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न; सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा इशारा.
केज (प्रतिनिधी): स्थानिक हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजासाहब यांच्या दि. २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या उरुसाच्या पार्श्वभूमीवर केज पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील कायदा, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीतील प्रमुख मुद्दे व मनोगते: सुरक्षा व कायद्याचा इशारा (पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ): सर्व सण-उत्सव सामाजिक ऐक्याने साजरे करावेत. सोशल मीडियावरून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा बेकायदेशीररीत्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद पाडण्याची सक्ती करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस प्रशासन अत्यंत कठोर कारवाई करेल. कोणत्याही अफवांवर किंवा आक्षेपार्ह पोस्टवर त्वरित रिॲक्ट न होता शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक ऐक्याचा निर्धार (पत्रकार अशोक सोनवणे): केजचे पावित्र्य, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपण्यास केजकर पूर्णपणे समर्थ असून, यात बाहेरील व्यक्तींचा कसलाही हस्तक्षेप अथवा लुडबुड सहन केली जाणार नाही. परंपरेची साक्ष (प्रा. हनुमंत भोसले): ख्वाजासाहब यांचा उरुस देशमुखांच्या वाड्यातून निघत असल्याने ही परंपरा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सौहार्दाचे मोठे प्रतीक आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न (महादेव सूर्यवंशी): अवाजवी किंवा अनधिकृत बंदमुळे व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे व्यापारी महासंघाने लक्ष वेधले. जातीय तेढ रोखण्याचे आवाहन (अाशोक गायकवाड): वैयक्तिक वादातून जातीय स्वरूप देणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवून प्रशासनाने दक्षता बाळगावी, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला उरुस समितीचे अध्यक्ष खतीब, संतोष गालफाडे, लखन हजारे, सतीश डांगे, तालेब इनामदार, गौतम बचुटे, तात्या गवळी, रणजीत घाडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.