ताज्या घडामोडी
बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले;प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले;प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
बीड (पाठलाग न्यूज प्रतिनिधी): शासकीय कार्यालयांमधील बोकाळलेला भ्रष्टाचार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बीड जिल्ह्यातून आज जिल्हा नियोजन कमिटीच्या बैठकीच्या लगबगी दरम्यान बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची एक अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ‘जिल्हा नियोजन समितीची’ महत्त्वपूर्ण बैठक आटोपून घरी परतताच, बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांना त्यांच्या राहत्या घरातून ४५ लाख रुपयांची भलीमोठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले असल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आलाआहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय बैठक पार पडली. या बैठकीला बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार हे देखील नटून थटून उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर लखमावार हे थेट आपल्या राहत्या निवासस्थानी गेले. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचला होता. घरी पोहोचताच लखमावार यांनी तक्रारदाराकडून ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या अचानक आणि गुप्तपणे घडलेल्या घटनेमुळे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अवघ्या काही मिनिटांतच घरातील या कारवाईमुळे बीडच्या प्रशासकीय यंत्रणेत आणि अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पाठलाग न्यूजचा सवाल: जर थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून निघून अधिकारी लाच स्वीकारण्याचे धाडस करत असतील, तर जिल्ह्यात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत? आणि लाचखोर अधिकाऱ्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. फिलहाल, एसीबी पथकाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि लखमवार यांच्या मालमत्तेची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, “भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही” असाच कडक इशारा या घटनेतून गेला आहे.




