शिक्षण की व्यवसाय? परदेशातील मोफत शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरभारतातील शिक्षण पद्धतीवर ‘तिखट’ प्रश्न!
विशेष प्रतिनिधी/पाठलाग न्यूज : जगातील विकसित देशांमध्ये शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असताना, भारतात मात्र शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे का? असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे. परदेशातील शिक्षण व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या एका महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत भारतीय शिक्षण पद्धती आणि येथील व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, “मी जपान, अमेरिका, युके यांसारख्या अनेक विकसित देशांमध्ये फिरले आहे. तिथे मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली की, अगदी प्राथमिक शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. तिथल्या सरकारी शाळांची पायाभूत सुविधा (Infrastructure) आपल्याकडील कोणत्याही खाजगी शाळेपेक्षा दहा पटीने सरस आहे.” या पार्श्वभूमीवर, आपल्या देशात शिक्षणाचा एक ‘बिझनेस’ का बनवला गेला आहे? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. ”पढेंगे आप, तभी तो बढेंगे आप” – मग शिक्षण इतके महाग का? देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. जर शिक्षणच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले, तर गरीब मुलांनी शिकायचे कसे? आज देशात अनेक सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा बंद केल्या जात आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व मुलांसाठी समान शिक्षणाची मागणी या परिस्थितीवर उपाय सुचवताना त्या म्हणतात, “जर खाजगी शाळा चालवायच्या असतील, तर त्यांची फी पूर्णपणे बंद केली पाहिजे. खाजगी शाळाही सरकारी शाळांप्रमाणेच चालवल्या जाव्यात, जेणेकरून गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांच्या मुलांपासून ते डॉक्टर-कलेक्टरच्या मुलांपर्यंत सर्व मुले एकाच छताखाली, एकाच गणवेशात आणि एकाच अभ्यासक्रमानुसार शिकू शकतील. जेव्हा असा भेदभाव संपेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘सरकारी व्यवस्था’ म्हणता येईल.” कर वसुलीत तत्परता, मग सुविधांमध्ये का नाही? देशातील वाढत्या कर रचनेवर (Taxes) आणि मोफत घोषणांवर (Freebies) बोट ठेवत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “जनतेकडून किती, कसा आणि का टॅक्स वसूल करायचा, यावर वर्षभर अगदी बारकाईने काम केले जाते. परंतु, तितक्याच बारकाईने आणि तत्परतेने नागरिकांना शुद्ध अन्न, दर्जेदार शिक्षण आणि मोफत आरोग्य सुविधा देण्यावर काम का होत नाही?” असा सवाल त्यांनी केला आहे. केवळ ‘पैसे कमावणे’ हाच विचार जर समाजात आणि व्यवस्थेत केंद्रस्थानी राहिला, तर देशाचा विकास कसा होणार? असा मूलभूत प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.