राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यावर एसआयटीचा शिकंजा!
राज्य : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला जुगार आणि भ्रष्टाचारी काळ्या बाजाराचे स्वरूप देऊन शिक्षण विभागातले अधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक यांनी संगनमतांने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून, शालार्थ आयडी प्रणालीचा गैर फायदा घेत आणि शासनाच्या पवित्र पोर्टलला अपवित्र करून, शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधींचा दरोडा घालत, सुशिक्षित बेकारांच्या कमजोरीचा गैरफायदा घेत राज्यभरात कोट्याधीचा घोटाळा केल्याचे उघड झाल्यानंतर, खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने प्रस्तुत घोटाळ्याच्या तपासासाठी एस आय टी नियुक्त केली असून, सदरच्या एसआयटीने हळूहळू राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपल्या चौकशीचा शिकंजा आवळ्यांने शिक्षण क्षेत्र सैरभर झाले असल्याचे दिसत आहे.
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी शालार्थ घोटाळ्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. सदरचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि जळगाव येथील माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळांचे पदाधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाईचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. त्याच कारवाईचा एक भाग म्हणून संबंधित सर्व ६८ संशयितांची सुनावणी लातूरमध्ये घेण्यात आली. त्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनीही दुजोरा दिला. संबंधितांवर आता काय कारवाई होते, त्याकडे जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. नागपूर, जळगाव, अमरावती नंतर मराठवाड्याचा नंबर असून बीड जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक भरती झाली आहे. या प्रकरणी प्राथमिक विभागाचे भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे नागनाथ शिंदे या दोन्ही शिक्षणाधिकारी यांची चौकशी करण्यात आली आहे.
लवकरच बीड जिल्ह्यातील संस्थाचालक आणि शिक्षक यांचीदेखील चौकशी होणार आहे. त्यासाठी एस आय टी ने संबंधिताना नोटीस बाजवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात एसआयटीने चौकशीचा धडाका सुरू केला आहे. शेकडो शिक्षक, शाळा संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आता एसआयटीचा शिकंजा कसला जात असून, अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हजारो शिक्षक संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, बीड जिल्ह्यात सुद्धा अलीकडच्या दोन वर्षात शेकडो शिक्षकांनी बनावट सेवा माहिती दाखवून शालार्थ आयडी मिळवली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे . यामध्ये काही शिक्षकांनी फर्जी अनुभव प्रमाणपत्र, तर काहींनी अनधिकृत नेमणूक आदेश वापरून सरकारी वेतन घेतले होते. सूत्रांच्या माहितीनुसार बीड सह राज्यातील अनेक जिल्ह्यातील खासगी व अनुदानित शैक्षणिक संस्था संशयाच्या केंद्रस्थानी आहेत. काही संस्थांनी लाखोंच्या बदल्यात शिक्षकांची बनावट कागदपत्रे वापरून शालार्थ प्रणालीत नाव नोंदवले असल्याचे समोर आले आहे.नस्ती नसलेल्या शिक्षकांना आता पुरावे द्यावे लागणार आहेत. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अंतरिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. आता या अहवालाच्या आधारे कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. राज्यातील ज्या शिक्षकांच्या नस्ती नाहीत, त्या सर्वच शिक्षकांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. अशा शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीचे मूळ पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात येतील. त्याबाबतची पत्रे तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नस्ती नसलेल्या शिक्षकांच्या विभागवार चौकशीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. या चौकशीतून शिक्षकांची नियुक्ती खरी की खोटी याची पडताळणी केली जाणार आहे. या चौकशीत जे शिक्षक पुरावे सादर करू शकणार नाहीत, त्यांची प्रकरणे तपासासाठी थेट एसआयटीकडेच पाठवली जाणार आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात सापडलेले राज्यभरातील अधिकारी, संस्थाचालक व शिक्षक एसआयटीच्या रडारवर आहेत. बोगस शालार्थ आयडी घोटाळा हा फक्त नागपूर पुरताच मर्यादित राहीला नसून या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याचे तपासात समोर आल्यामुळे नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांची एसआयटी आणि राज्य सरकारची समन्वयक SIT संयुक्तपणे राज्यभरातील अशा प्रकरणाची चौकशी करणार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती २ ते ३ हजार कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्यक्त केला आहे. राज्यभरातील अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी झा यांच्या एसआयटीला आणखी मनुष्यबळ तसेच पोलिस अधिकाऱ्यांची गरज पडल्यास आवश्यकतेनुसार त्यांचा समावेश करून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. बोगस शालार्थ आयडी घोटाळा राज्यव्यापी असल्याने आणि त्याची पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्यामुळे या घोटाळ्याच्या तपासातील प्रगतीचा अहवाल नियमित सादर करण्याचे आदेश एसआयटीला देण्यात आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात आता राज्यभरातील किती शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षक आणि संस्थाचालक तुरुंगाची हवा खातात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. > “शिकंजा इतका कसला गेला आहे की, बनावट नेमणूक झालेल्या शिक्षकांना सेवा टिकवून ठेवणे अशक्य होणार आहे,” असे एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने सांगितले. SIT मार्फत दोषी आढळलेल्या शिक्षकांवर गुन्हे दाखल होणार असून, काहींना सेवेतून बडतर्फ, तसेच संस्थांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई होणार आहे. काही शिक्षकांचे वेतन तात्पुरते थांबवण्यात आले असून, त्यांना स्पष्टीकरण मागवले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.