‘उबाटा’ चे आणखी 3 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात.
दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी सत्कार केल्याबद्दल ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात चांगलीच जुम्पल्याचे पाहायला मिळत आहे . ठाकरे आणि राऊत ज्या एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवतात, त्यांच्या पक्षाच्या खासदाराने दिल्ली मध्ये आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुतळात चर्चेला उधाण आले आहे.शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतेच राजधानी नवी दिल्लीत सर्व खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल तीन खासदार उपस्थित होते. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, दिल्लीत अधिवेशनाच्या निमित्ताने आल्यावर महाराष्ट्रातील सर्व खासदार राजकीय विरोध व पक्ष विसरुन एकत्र येतात. त्याच प्रकारे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन बाजूला विभागले गेलेले, मात्र मुळात जुने सहकारी असलेले खासदार एकत्र आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात असला तरी, राऊतांनी शरद पवार यांचे बाबद तोफ डागली असताना ठाकरेंच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्तित केला जात आहे.’दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार हा प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांचा नव्हे; तर शिवसेना फोडण्यासाठी मदत करणारे; तसेच महाराष्ट्र तोडणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा झाला आहे,’ अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती आणि ‘या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जायला नको होते,’ अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. त्यावर ‘शरद पवार यांनी काय करायचे आणि काय नाही करायचे, हे सांगण्याएवढे राऊत मोठे नाहीत,’ असा टोला शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवरून उबाटा च्या खासदारांची स्नेह भोजनाला उपस्तिथी हा चर्चेचा विषय आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.