विहिरीत जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट, १५ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी.
तब्बल तीन महिन्यांनंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
केज – केज तालुक्यातील जोला शिवारात एका विहीरीचे खोदकाम करीत असतांना विहिरीत जिलेटीनच्या काड्यांचा स्फोट झाल्याने १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी तीन महिन्याने तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला गावच्या शिवारात एका विहिरीचे खोदकाम केले जात होते. विहिरीतील खडक फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट घडवून आणण्यासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने होल मारण्याचे काम ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरु असताना आनंद विकास हलकडे व अनिल निंबाळे हे सदर होलमध्ये जिलेटीन भरल्यानंतर त्यावर वाळु टाकत होते. याचवेळी गोकुळ शेषेराव ढाकणे, शेषेराव ढाकणे, शिवाजी ठोंबरे या तिघांच्या निष्काळजीपणामुळे अचानक स्फोट झाल्याने आनंद विकास हलकडे (वय १५) हा गंभीर जखमी झाला. या घटनेत आनंद याचा एका डोळा निकामी झाला असून दुसऱ्या डोळ्याने थोडेच दिसत आहे. त्याचा डावा हात कोपरात आखडुन गेला असुन उजव्या हाताचा अंगठा देखील तुटलेला आहे. तर पोटावर, तोंडावर, हातावर, छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. अशी तक्रार ८ जुलै रोजी या मुलाची आई सौ. पार्वती विकास हलकडे यांनी दिल्यावरून गोकुळ शेषेराव ढाकणे, शेषेराव ढाकणे (दोघे रा. सारूळ ता. केज), शिवाजी ठोंबरे (रा. दहिफळ वडमाऊली ता. केज) या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा आनंद हलकडे हा कामावर होता का? कामावर असेल तर,तो बालकामगार असतांना अशा जोखमीच्या कामावर त्याला कसे काय ठेवले ? या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे. पुढील तपास फौजदर आनंद शिंदे हे करत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.