इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाइन.राज्यातील शाळांना दिल्या ‘स्विफ्ट चॅट’ वापराच्या सूचना.
छ. संभाजीनगर : राज्यातील सर्व गशाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आता ऑनलाइन पद्धतीने नोंदवणे शाळांना बंधनकारक करण्यात आले असून, शिक्षण आयुक्त कार्यालयाने ऑक्टोबर २०२५ पासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘स्विफ्ट चॅट’ या अॅपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ या सोर्सद्वारे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय कार्यक्षमता निर्देशांक (पीजीआय) अहवालांचा संदर्भ घेत शाळांना डिजिटल हजेरी ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले असून, यामुळे राज्य व जिल्हा आणि तालुका पातळीवर माहिती संकलन आणि विश्लेषण सुलभ होईल, तसेच शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल. शालेय हजेरी नोंदवण्यासाठी ६० हजारांहून अधिक शाळांनी ऑनलाइन हजेरी प्रणालीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही फक्त अडीच ते तीन हजार शाळा नियमितपणे ऑनलाइन हजेरी घेत असल्याचे समोर आले.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या आहेत. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील शिक्षणाधिकारी यांनाही या पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियमित आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले. सुरवातीच्या दोन महिन्यांमध्ये पारंपरिक हजेरी आणि ऑनलाइन हजेरीचा संगम ठेवावा आणि नंतर फक्त ऑनलाइन हजेरीच स्वीकारली जाईल. यासाठी राज्यातील शाळेतील शिक्षका व मुख्याध्यापकांना सदर अॅपचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने सांगितले असून, बोगस विद्यार्थी नोंदणीवर टाच बसणार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.