केज तालुक्यातील लहुरी येथील बडे बाबा शिक्षण संस्थेच्या सचिवाकडून शासनाची घोर फसवणूक.संस्थेची मान्यता काढून घेण्याची मागणी. केज: कर्मचाऱ्यांच्या पगारातला हिस्सा वसुलीसाठी स्वतः मृत्यू स्वीकारलेल्या एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या आणि ज्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातल्या हिश्याच्या देवान- घेवाणीतून पूर्वी ज्यांची हत्या झाली असल्याची पार्श्वभूमी असलेल्या केज तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यरत महिला सचिवाने आपल्या शाळेच्या प्रांगणाचा व इमारत ज्या जागेवर आहे त्या परिसराचा गैरवापर करून, प्रस्तुत क्रीडांगणावर पीक-पेरा दाखवून चक्क पिकविमा मंजूर करून घेऊन शासनाची व शिक्षण विभागाची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चाळक यांनी केली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ज्या सरस्वतीच्या शिक्षण संस्था नावाच्या मंदिरात ज्ञानाचे धडे दिले जावेत असा संकेत आहे , त्याच ज्ञान मंदिर रूपी शाळेच्या आवारात शासकीय योजनेचा गैरवापर करून आर्थिक लाभ बेकायदेशीर पणे मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार केज तालुक्यात लहुरी येथील बडे बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ चक्क या शिक्षण संस्थेने शाळेची इमारत आणि खेळाचे मैदान असलेल्या जमिनीवर घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संस्थेवर फौजदारी कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील लव्हरी येथील ‘श्री बडेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ’ या शिक्षण संस्थेने संस्थेच्या नावे असलेल्या गट क्रमांक १२२/२ मधील ०.८० हेक्टर जमिनीवर शाळेची इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करण्यात आलेले आहे. ही जमीन अकृषिक वापरासाठी असतानाही, संस्था चालकांनी २०२३ मध्ये या जमिनीवर पिकांची पेरणी केल्याची खोटी कागदपत्रे तयार केली असून,या कागदपत्रांच्या आधारे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा अर्ज दाखल करून शासनाची फसवणूक केली आहे. ज्या क्षेत्रामध्ये चक्क शाळेची इमारत व विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्या तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे ग्राउंड आहे, त्याच क्षेत्रावर संस्थेने चक्क पिकांची पेरणी केली असल्याचे दाखवले आहे. संबंधित तलाठ्याने देखील सदरील क्षेत्रावर पीक पेरा नोंद केलेला आहे. या बोगस कागदपत्रांच्या आधारे संस्थेने चक्क पिक विमा मंजूर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप चाळक यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे. “शासकीय योजनेचा गैरवापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर कायदेशीर कारवाई करावी आणि संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करावी,” अशी मागणी संदीप चाळक यांनी केली आहे. या प्रकरणातील फसवणुकीची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे दिसून येते. विमा भरण्यासाठी वापरण्यात आलेले तपशील खालीलप्रमाणे आहेतः अर्ज क्रमांक (Application ID): ०४०१२७०३००१०५११५६८४०२ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक: ९५११८१५५५७ सदरचा मोबाईल हा संस्थेच्या सचिव श्रीमती मंगल खांडेकर यांच्या नावाने दाखवत आहे. बँक खातेः स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्रमांक – ६२२१२५१२११२ मिळालेली रक्कमः २५% अग्रिम म्हणून ५,२११ रुपये खात्यावर जमा झालेली आहे. चाळक यांच्या तक्रारीनुसार प्रस्तुत संस्थेत अनेक प्रकारचे शासनाला फसवणारे गैरप्रकार आहेत. पदभरतीतही गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षण संस्थेवर केवळ पीक विम्याच्या फसवणुकीचाच नव्हे, तर,पदभरतीतही गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संस्थेतील अनेक शिक्षकांची पदे रिक्त असूनही ती भरली जात नाहीत, अतिरिक्त शिक्षकांना आदेश असूनही रुजू करून घेतले गेलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. पात्र आणि सुशिक्षित उमेदवार असतानाही त्यांना डावलून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपही संदीप चाळक यांनी केला आहे. प्रस्तुत संस्थेतील गैरकारभाराची व शासन व समाजाला फसवणुकीची तात्काळ चौकशी न झाल्यास व संस्थेची मान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही चाळक यांनी निवेदनातून दिला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे शिक्षण संस्थेनेच अशा प्रकारे योजनेचा गैरवापर केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता प्रशासन काय भूमिका घेणार आणि संबंधित संस्थेवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.