बीड: भाजपने लोकसभा निवडणुकीपासून मोठा धडा घेतला आहे.लोकसभा निवडणुकीत विनाकारण उमेदवारांची नावे जाहीर करण्यास विलंब लावला गेला आणि त्याचा फटका उमेदवारांना बसला असल्याचे समोर आले आहे. उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही शिवाय सेट करण्यात आलेले नॅरेटिव थांबू शकले नाही; म्हणून आता विधानसभेला विरोधकांना खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याची संधी आणि अवधी मिळू नये म्हणून भाजपने राज्यातील 55 उमेदवारांची यादी अंतिम केली असल्याची खात्रीलायक माहिती असून,सदरच्या संभाव्य यादीत केज-अंबाजोगाई विधानसभेच्या स्टॅडिंग आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांचे नाव असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. कोणत्याही वेळी ही यादी जाहीर होणार आहे.या बाबत अधिक माहीती अशी की, राज्यातील भाजपच्या ५५ उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित करण्यात आली असून, प्रस्तुत यादीत केज विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या यादीत भाजपच्या विद्यमान आ.नमिताताई मुंदडा यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. . केज विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक काळ म्हणजे 1990 पासून स्व. आ. डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांचे वर्चस्व होते. स्व.विमलताईंनी सन 1990, 1995, 1999, 2004 व 2009 अशा सलग पाच वेळा जिंकण्याचा विक्रम केला. 2014 च्या मोदी लाटेत आ. नमिताताई मुंदडा यांचा पराभव झाला. त्या दरम्यान त्यांनी 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहूनच काम केले मात्र त्या ठिकाणी ना. धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे जमेना झाले म्हणून त्यांनी 2019 च्या निवडणुकीत आ.पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली व विजयी झाल्या. ‘ मुंदडा आणि विजय ‘ हे समीकरण बनलेले आहे. मातब्बर म्हणून त्यांचा लौकिक आहे.सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण बनले आहे. अनेक इच्छुक उमेदवार भाजपकडे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत मात्र या ठिकाणी आ. नमिताताई मुंदडा यांनाच उमेदवारी मिळणार आहे कारण त्यांनी गेल्या पाच वर्षातील केलेली विकास कामे व त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांचा असलेला जनसंपर्क यामुळे त्यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. तसेच आ. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून ओबीसी मतांची मजबूत वोट बँक सोबत राहणार असल्याने मुंदडा यांना पराभूत करणे अवघड आहे. कुठल्याही समाजाला न दुखवता ‘ बॅलन्स ‘चे राजकारण त्यांनी गेली अनेक वर्षात केलेले आहे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाजवळ सुद्धा आ.मुंदडा यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात व आ. पंकजाताई यांच्या मनात कसलाही किंतु- परंतु नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीचा मौसम जोरात सुरू आहे.अनेक इच्छुक मैदानात आलेले आहेत.राज्यातील भाजप पक्ष हा आता अधिक दक्ष झाला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत उमेदवारी उशिरा जाहीर करणं पक्षाला ‘ घाट्याचे ‘ ठरले आहे म्हणून ती चूक विधानसभा निवडणुकीत करायची नाही ही भूमिका घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने ज्या भाजपच्या जागा ‘ कन्फर्म ‘ आहेत त्यांची उमेदवार जाहीर करून त्यांना कामाला लावण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. राज्यातील 55 भाजप उमेदवारांची यादी तयार करून ती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली व त्यांचा ग्रीन सिग्नल घेऊन पुन्हा ती यादी महाराष्ट्रात परत आलेली आहे. ती यादी येत्या काही दिवसात प्रसिद्ध केली जाणार आहे. परंपरागत ज्या -ज्या भाजपच्या जागा आहेत त्यांची उमेदवार जाहीर होणार आहे. यामध्ये केज विधानसभेचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केजमधून विद्यमान आ.नमिताताई मुंदडा यांनाच उमेदवारी मिळणार आहे.कारण उमेदवार बदलून विनाकारण डोकेदुखी करून घेण्याच्या मानसिकतेत भाजपा नेतृत्व नाही. आमदार म्हणून मुंदडा यांच्याकडे सर्व काही आहे.
सत्तेचा अनुभव आहे,प्रचंड जनसंपर्क आहे, निवडणुकीसाठी लागणारे सर्व साधने व यंत्रणा आहे. त्यामुळे विनाकारण वातावरण ‘ डिस्टर्ब ‘ करण्याचा प्रयत्न केला जाणार नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून आ.नमिताताई मुंदडा असणार आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.