न्यायालय आदेशाच्या अवमानप्रकरणी शिक्षण उपसंचालकाला३ लाख ३० हजारांचा दंड.
प्रतिनिधी : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून मनमानी करणाऱ्या शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या डबल बेंच खंडपीठाने ३ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला. या रकमेतून ११ याचिकाकर्त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावी. तर याचिकाकर्त्यांनी त्यातील दहा हजार रुपये दोन अनाथ आश्रमांना द्यावेत, असा आदेश यावेळी दिला. ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील १८ शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. मात्र, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी या शिक्षकांना मान्यता नाकारली होती. त्याविरोधात शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या शिक्षकांना सेवेत सामावून घेऊन त्यांना वेतनासाठीचा आयडी देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतरही आयडी न मिळाल्याने राजेंद्र सावंत, सुप्रभा ससाणे, निलेश ढोले, शसेगिता शिंगाडे, उषा दळवी, अनिता करोटे, अंजिव सपाळे यांच्यासह ११ शिक्षकांच्या वतीने अॅड. नरेंद्र बांदिवडेकर यांनी स्वतंत्र अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलींद साठये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. नरेंद्र बांदिवडेकर यांनी बाजू मांडताना न्यायालयाच्या आदेशानुसार उपसंचालक संदीप सांगवे यांनी मूळ याचिकाकर्त्या शिक्षकाला तातडीने सामावून घेतले. त्यानंतर एका शिक्षिकेला अवमान याचिका दाखल केल्यानंतर सामावून घेतले. तर अन्य तीन शिक्षकांना सप्टेंबरमध्ये सामावून घेतले, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेळी अॅड. बांदिवडेकर यांनी प्रत्येक शिक्षकाला नाहक त्रास झाल्याने एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती केली. याची दखल खंडपीठाने घेतली. सर्व शिक्षकांना तातडीने वेतनासाठीचा शासंत आयडी देण्याच्या आदेशाबरोबरच थकीत पगार तातडीने देण्याचे आदेश दिले. तसेच उपसंचालक संदीप सांगवे यांनी ११ याचिकाकर्त्यांना प्रत्येकी ३० हजारप्रमाणे ३ लाख ३० हजार रुपये ३० नोव्हेंबरपूर्वी न्यायालयात जमा करावेत, असे आदेश देत याचिका निकाली काढली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.