प्राप्त तक्रारींवरुन बोगस डॉक्टर्सची यादी तयार करा — जिल्हाधिकारी.नागरिकांनी माहिती देण्याचेही जिल्हाधिकारी यांचे आवाहन.
बीड: जिल्हयात बोगस डॉक्टर संदर्भाने आलेल्या तक्रारीनुसार संशयित डॉक्टर्सची यादी तयार करुन त्यावर वेळोवेळी तपासणी करुन याबाबत कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज दिले. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची त्रैमासिक सभा आज झाली यात त्यांनी आतापर्यंतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. गेल्या 9 महिन्यात तालुकास्तरीय तपासणी पथकाने 3 ठिकाणी तपासणी केली मात्र असे डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले.आपल्या गावात कोणी बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर नागरिकांनी आपापल्या भागातील तालुका आरोग्य अधिका-याकडे तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी नागरिकांना केले आहे. तालुक्यासह गावपातळीवर ए.एन.एम. तसेच आशा वर्कर यांच्या माध्यामातून लक्ष ठेवण्याची आणि माहिती मिळवण्याची सुरुवात करा असे निर्देश त्यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांना दिले.आतापर्यंत आलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी तालुकास्तरावरील अधिका-यांना सांगण्यात यावे जेणेकरुन अशा बोगस डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करता येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले.बैठकीस समितीचे सदस्य सचिव प्र. पोलीस अधिक्षक उमाशंकर कस्तुरे तसेच सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.