बीड जिल्ह्याच्या राजकारणातील “पितामह” जयदत्त आण्णाच बेदखल!!!
काळाचा महिमा की बदलत्या राजकारणाचा बळी?
———————————- . बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात एकेकाळी ज्यांचा प्रभाव आणि आदेश ‘सर आँखो पर ‘ मानला जायचा असे राजकारणातील थोरले घराणे म्हणून ज्यांची ओळख होती असे जेष्ठ जयदत्त (अण्णा) क्षीरसागर हे स्वतःच्या उमेदवारीसाठी धडपडताना दिसत आहेत. कारण त्यांच्या राजकीय भुमिकेमुळे त्यांची परवड होत असल्याचे दिसत आहे. आमदारकी लढविण्याची तीव्र इच्छा आहे. पण उमेदवारी आजच्या तारखेत द्यायला कोणी तयार नाही. लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांची भूमिका थोडी चुकलीच. पुतणेशाहीने बेजार अण्णा आता काय करणार?याकडे लक्ष लागले आहे. सध्या वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. बीडमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. परंतु दस्तुरखुद शरदचंद्र पवार हे आ. संदिप क्षीरसागर यांनाच उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. एकेकाळचा बाप माणूस आज उमेदवारीसाठी बेजार असल्याचे दिसत आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्या उमेदवारीचा निर्णय होईल असे सांगितले जात आहे. चुलत्या- पुतण्यात समन्वय झाल्याची चर्चा आहे परंतु त्यातील वास्तविकता समोर आलेली नाही. त्यामुळे अंदाज बांधणे अवघड बनले आहे.अण्णा यांच्यावर काळाने उगवलेला सूड म्हणायचे की बदलत्या काळाचा बळी म्हणायचे. आजही अण्णांकडे स्वतंत्र व्होट बँक आहे पण उमेदवारी नसल्याने पेच निर्माण झाला आहे. ▪️जयदत्त अण्णा क्षीरसागर हे अवघ्या महाराष्ट्रात आदरयुक्त आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात.बीड जिल्ह्याच्या राजकारणात व समाजकारणात त्यांचा मोठा प्रभाव राहीलेला होता व आजही आहे. स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या राजकीय मुदस्सदीगिरीमुळे क्षिरसागर घराण्याचा राजकीय क्षेत्रात मोठा प्रभाव होता. १९९० ते २०१४ पर्यंत बीड जिल्हयाचे राजकारण क्षीरसागर घराण्याभोवतीच फिरायचे . जिल्ह्यातील सहा आमदार व कोणाला उमेदवारी दिली जाणार हे नगर रोडच्या बिदूसरेच्या काठावरील घरी ठरले जायचे. परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या घराण्याच्या राजकारणाला घरघर लागल्याचे चित्र आहे. जयदत्त अण्णा क्षीरसागर हे जिल्ह्याचे आदरयुक्त व्यक्तीमत्व राहिलेले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. शह-काटशह त्यांनी कधी पाहिला नाही. उलट सर्वांना सोबत घेवून चालण्याची त्यांची रणनिती राहिलेली होती. परंतु 2019 साली त्यांचे पुतणे आ.संदिप क्षीरसागर यांनी त्यांना आव्हान दिले. तसे आव्हान त्यांनी 2016 च्या नगरपालिका निवडणुकीतच दिले होते. आ.संदिप क्षीरसागर यांनी नगरपालिका निवडणुकीत चांगले यश संपादन करुन आपण आमदारकीचा तिर मारु शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आणि जयदत्त अण्णांना आव्हान देत विधानसभेला केवळ 1700 मतांनी आण्णाना पराभूत करुन त्याचे पुतणे संदिप क्षीरसागर आमदार झाले. गेल्या पाच वर्षात जयदत्त अण्णांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना चुचकारुन पाहिले मात्र त्यांची विचारधारा आणि राजकीय पक्षांची विचारधारा यात समन्वय जुळला नाही. भाजपा, शिवसेना, दोन्ही शिवसेना याकडे लक्ष वेधून पाहिले मात्र यश आले नाही. आज उमेदवारीसाठी त्यांची धडपड सुरु आहे. उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत परंतु आजच्या स्थितीला कुठलीही कमीटमेंट आल्याचे दिसत नाही. अण्णांनी खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे उमेदवारी मागितल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कारण सद्यस्थितीला जिंकण्याची हमी केवळ शरदचंद्र पवार गटाकडेच दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वावड्या उठविल्या जात आहेत. अण्णांची धडपड उमेदवारीसाठी आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व असणे ही गरज आहे. परंतु पक्ष नेतृत्व काय भुमिका घेतो हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे. आ.संदिप क्षीरसागर हे काय भुमिका घेतात हेसुद्धा महत्वाचे आहे. उमेदवारीसाठी अण्णांची दमछाक दिसून येत आहे. पुतणे शाहीकडून अण्णांची मोठ्या प्रमाणात दमछाक सुरु आहे. पुतणेशाही घाम कसा काढू शकते याचा अनुभव आज स्वतः अजितदादा पवार सुद्धा पाहत आहेत. या अगोदर अजितदादांनी शरद पवारांची सुद्धा दमछाक केली आहे. आता आ.रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे अजित दादाची दमछाक करत असल्याचे दिसत आहे. अण्णांचा प्रवास तसा खडतर मानला जात आहे. राजकारणामध्ये एकेकाळी मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांना पाहिले जायचे परंतु आज त्यांची उमेदवारीसाठी जी घालमेल सुरु आहे त्याकडे पाहिल्यानंतर अनेकांना हे चित्र पाहवेस वाटत नाही. अण्णा विधानसभेच्या मैदानात असतील हे खरे आहे परंतु उमेदवारी कोणाची याचे उत्तर एक दोन दिवसात मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.